आंबा घाटात ट्रक कड्यावर आदळला, एका महिलेचा मृत्यू
रत्नागिरी :
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाटात ट्रक कड्यावर आदळून झालेल्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला, अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत.
गुरुवारी रात्री कोल्हापूरहून जयगडकडे निघालेल्या ट्रकमध्ये रत्नागिरीकडे जाणारे काही प्रवासी बसले,ट्रक आंबा घाटात आला असता एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले,आणि ट्रक घाटातील डाव्या बाजूच्या डोंगरकडय़ावर जोरात आदळला.
ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या महिला सोनाबाई सखाराम लावनदे (वय ५८ वर्षे) या अपघातामध्ये ठार झाल्या, तर ज्योतिबा बाबुराव लवनदे, (वय ५२) गंभीर जखमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील वासोळे येथील एकाच कुटुंबातील नातेवाईक या ट्रकमध्ये बसले होते. त्यापैकी रामकृष्ण सखाराम लवनदे, सोनाक्का बाबुराव लवनदे, स्वाती प्रदीप पिसाळ, आरती योगेश झरंडे यांना किरकोळ मार लागला आहे.
हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.