केंद्र सरकारच्या महागाई विरोधात आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा : हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी
करवीर :
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने मोदी सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात आमदार पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यातील बीडशेड ते कसबा बीड पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
आमदार पी.एन.पाटील यांच्या उपस्थितीत बीडशेड येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. घोषणा बाजीने परिसर दणाणून गेला होता. पदयात्रा कसबा बीड येथे आल्यावर श्री महादेव मंदिरात सांगता सभा घेण्यात आली.
सभेत बोलताना आमदार पाटील म्हणाले, भाजप सरकारने देशाला महागाईच्या खाईत लोटून जनतेला देशोधडीला लावले आहे. महागाई प्रचंड वाढल्याने जनता त्रस्त आहे. काँग्रेसने उभा केलेले उद्योग, कंपन्या मोदी सरकार विकायला निघाले आहे. देशात हुकूमशाही कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पंतप्रधानाना वेळ नाही. त्यामुळे या शेतकरीविरोधी सरकारला घालवून काँग्रेसचे सरकार आणल्याशिवाय पर्याय नाही.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनीही केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. पदयात्रेत जि.प.अध्यक्ष राहुल पाटील,गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक उदय पाटील, संजय गांधी कमिटी अध्यक्ष संदीप पाटील, अमर पाटील, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, अविनाश पाटील, सुभाष सातपुते, बी.एच.पाटील, चेतन पाटील , भोगावती कारखान्याचे संचालक यांच्या सह करवीर विधानसभा मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने कार्यकार्ये सहभागी झाले होते.. शेवटी आभार गोकुळचे माजी संचालक व लोकनियुक्त सरपंच सत्यजित पाटील यांनी मानले.