जिजाऊंच्या संस्काराची शिदोरी जपूया : इंद्रजित देशमुख विश्वास पाटील (आबाजी) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाची सुरुवात मातृ – पितृ पाद्य पूजनाने, ७५ आकाराची प्रतिकृती साकारात मेणबत्ती प्रज्वलित करून अनोखी शुभेच्छा
कोल्हापूर :
आई वडील हे घरातील सोन्याचे दोन खांब आहेत. आई वडिलांचे दर्शन म्हणजे ईश्वराचे दर्शन. आईची कुशी जगातील सर्वात मोठा विसावा. वडील हाच मुलीचा पहिला आणि खरा हिरो आहे. जो माणूस जोडेल, प्रेम पेरेल अशा युवकांची समाजाला गरज आहे. मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर करणे हे आपले संस्कार आहेत. समाज नितिमूल्यांवर आणि चांगुलपणावर जगतो. जिजाऊंच्या संस्काराची शिदोरी जपूया, असे प्रतिपादन व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी केले.
शिरोली दुमाला ता. करवीर येथे गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस अंतर्गत आयोजित मातृ - पितृ पाद्य पूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रथम योग शिक्षक दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाद्य पूजन कार्यक्रम झाला.
शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून ७५ आकाराची प्रतिकृती साकारात मेणबत्ती प्रज्वलित विद्यार्थ्यांनी विश्वास पाटील यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. कुटुंबीय व सर्व शिक्षकांनी पुष्पवर्षाव करत अभीष्टचिंतन केले.
इंद्रजित देशमुख पुढे म्हणाले, समाजात मोठ्या प्रमाणात बेईमानी, स्वार्थी, अत्याचारी वृत्ती फोफावते आहे. नीतिमत्ता संपत चालली आहे. लेकरांच्या डोक्यात हिंसा व घृणा पसरवली जात आहे. नात्यांची वीण ढिली होत आहे. माणुसकी संपत चालली आहे काय असे वाटू लागले आहे. अशा वेळी समाजानेच जागृत झाले पाहिजे. बेईमान आणि आत्याचारी वृत्तीचा धिक्कार केला पाहिजे. आनंदी जीवनासाठी वाईट गोष्टींचा त्याग करा अन चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी केले. यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील, बाळासाहेब खाडे, प्रा.किसन चौगले, कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, तुकाराम पाटील, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, सरपंच सचिन पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, माधव पाटील, शिवाजी देसाई, माजी पोलीस पाटील सुभाष पाटील आदीसह विद्यार्थी – पालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.