जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
कोल्हापूर :
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना विषाणू (कोविड-19) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे, शारिरिक व सामाजिक अंतर राखणे व सॅनिटायझरचा वापर करणे यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन अधिका -अधिक खबरदारी घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणीव्दारे कोरोना विषाणू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी यापूर्वी दिलेल्या आदेशांची / सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
अ) मास्कचा वापर करणे – सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. व्यापारी दुकाने, खाजगी व शासकीय आस्थापना, मॉल्स, फेरीवाले, भाजी – फळे विक्रेते, कारखाने, प्रवासी वाहने, ऑटो रिक्षा इत्यादी ठिकाणी ‘ मास्क नाही – प्रवेश नाही ‘ ‘ सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही ‘ यांची कडक अंमलबजावणी सर्व आस्थापना मालक, ग्राहक व नागरिकांनी यांनी करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थूंकण्यास परवानगी असणार नाही, असे निर्देशित करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे वरील निर्देशांचे पालन सर्व नागरिक, सर्व शासकिय व खाजगी आस्थापना यांच्याकडून काटेकोरपणे होत असलेबाबतची खात्री करणे तसेच उल्लंघन झालेचे निदर्शनास आल्यास त्याबाबत दंडात्मक कारवाई करणेबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.
ब) सामाजिक अंतर राखणे – सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना, शासकिय अधिकारी, कर्मचारी व इतर सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी बैठकीसाठी अथवा इतर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी एकत्र येताना परस्परात वैद्यकियदृष्ट्या निर्धारित केलेले सामाजिक अंतराचा निकष कटाक्षाने पाळणे बंधनकारक करणेत आलेले आहे.
क) सॅनिटायझरचा वापर करणे व स्वच्छता राखणे – सर्व शासकिय व खाजगी आस्थापनांनी त्यांचे प्रवेशद्वार व आवार याठिकाणी सॅनिटायझर डिस्पेन्सर उपलब्ध करुन ठेवणेबाबत तसेच सर्व जागांची प्रभावी व वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण.
1) सभागृहात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, अंत्यंविधी / अंत्ययात्रा यासाठी मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधिन राहून परवानगी देण्यात आलेली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमास बंदिस्त सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपर्यंत, लग्नसमारंभास जास्तीत जास्त 50 व्यक्ती, अंत्ययात्रा / अत्यंविधी कार्यास जास्तीत जास्त 20 व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी देणेत आलेली आहे. तथापी सद्यस्थित ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असलेचे तसेच मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन होत नसलेचे निदर्शनास येत आहे. तरी बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत आयोजित करणेत येणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रम / लग्नसमारंभ यांचे आयोजक त्याचप्रमाणे संबंधीत आस्थापना यांचेकडून मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबतची तपासणी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी करुन उल्लंघन करणाऱ्या आयोजक / आस्थापना यांचेवर दंडात्मक कारवाई व आवश्यकते प्रमाणे आस्थापना बंद करणे इ. कार्यवाही करणेत यावी. मुख्याधिकारी किंवा त्यांचे प्रतिनीधी, स्थानिक प्राधिकारण व पोलीस विभागामार्फत अशा आस्थापनांना लेखी नोटीस द्यावी व अटींचे पालन करणेविषयी निर्देशीत करावे. त्याच प्रमाणे अटींचे उल्लंघन झाल्यास अशा आस्थापनांचे प्रमुख / व्यवस्थापका विरुध्द दंडनिय व फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी समज द्यावी.
2) स्थानिक आठवडी बाजार (जनावरांच्या बाजारासह) सुरू राहण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आठवडी बाजाराबाबत स्थानिक ग्रामिण व नागरी प्रशासन कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने योग्यत्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत व कोविड-19 बाबतचा शिष्टाचार काटेकोरपणे पाळणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर निर्देशांचे काटेकोरपणेपालन केले जात असल्याबाबतची खातरजमा संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी करुन उल्लंघन करणाऱ्या आयोजक / आस्थापना यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
3) प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील धार्मिक स्थाने / प्रार्थना स्थळे सुरु करण्यास अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यास सांस्कृतिक पार्श्वभूमी असून जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमध्ये गाव / पंचायत पातळीवर अनेक यात्रा व उत्सवांचे आयोजन करण्यात येते. कोविड -19 च्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, उरुस इ. चे आयोजन करण्यास बंदी असेल. अशा ठिकाणी पारंपारीक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी / पुजारी व भाविक यांच्या उपस्थतीत पूजा करण्यास परवानगी असेल. याबाबत संबंधीत स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी कोणतेही यात्रा, उत्सव, उरुस इ. पुढील आदेश होई पर्यंत होणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी उल्लंघन आढळेल त्या त्या ठिकाणी स्थानिक प्राधिकारणाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई करावी.
4) राजकीय सभा, मोर्चे, मिरवणूका, संमेलने या सारख्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना कोणत्याही परिस्थितीत आयोजन करण्यास बंदी असेल. परंतु असे आयोजन बंदीस्थ जागेत असल्यास तेथील क्षमतेच्या 50 टक्के प्रवेश क्षमता व निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतर इ. अटीस अधिन राहून तसेच मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी 6-6 फुटांवर खुणा करुन त्यानुसार बसण्याची किंवा उभे राहण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील किंवा उभे राहतील याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणाऱ्या या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी ६ फूट अंतरावर असावेत इ. अटीस अधिन राहून त्या त्या कार्यक्षेत्रातील सक्षम प्राधिकारी म्हणून संबंधीत पोलीस निरीक्षक व स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतले खेरीज आयोजित करण्यात येवू नयेत.
5) शाळा, कॉलेजीस, कोचींग क्लासेसच्या ठिकाणी मास्क तसेच विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे यांची जबाबदारी संबंधित शाळा, कॉलेजीस, कोचींग क्लासेसचे प्रमुखांनी घ्यावयाची आहे. या अटीचे पालन न झाल्यास संबंधीत संस्था प्रमुख / व्यवस्थापक दंडनिय व फौजदारी कारवाईस पात्र राहतील. अशा संस्थामध्ये सर्व अटींचे पालन होते किंवा कसे याची तपासणी करणेसाठी व उल्लंघनाचे ठिकाणी त्या त्या संस्था प्रमुखांवर / व्यवस्थापकावर कारवाई करणेसाठी स्थानिक प्राधिकरणाने पथके नेमावित व वारंवार तपासणी करावी. अटींचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांवर / व्यवस्थापकावर दंडनिय व फौजदारी कारवाई करणेसाठी संबंधीत मुख्याधिकारी किंवा त्यांचे प्रतिनीधी, संबंधीत स्थानिक प्राधिकारण व त्या त्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करणेत येत आहे.
6) जिल्ह्यातील हॉटेल / बार / रेस्टॉरंट यांना मार्गदर्शक सूचना, अटी व शर्ती घालून आस्थापनेच्या क्षमतेच्या 50% क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन हॉटेल / बार / रेस्टॉरंट सुरु करणेचे आहेत. सदर व्यवसाय करत असताना कोणत्याही स्वरुपात कोविड-19 चा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या हॉटेल / बार / रेस्टॉरंट मध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसेल व कोविड-19 संसर्ग वाढण्यास मदत होत असेल अशा आस्थापना विरुध्द दंडात्मक कारवाई करणेचे अधिकार आवश्यकता पडल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्याचेसुध्दा अधिकार संबंधीत सक्षम अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील हॉटेल / बार / रेस्टॉरंट यांच्याकडून शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत असलेबाबतची खात्री यापूर्वी अधिकार प्रदान करणेत आलेल्या कार्यालयाकडून तसेच परवाना अधिकारी यांच्याकडून करण्यात यावी. स्थानिक प्राधिकरण व पोलीस विभागामार्फत त्यांचे त्यांचे कार्यक्षेत्रात अशा सर्व आस्थापनांना अटी व कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक मानके याबाबत लेखी नोटीस द्यावी व उल्लंघन झाल्यास अशा आस्थापनां विरुध्द दंडनिय व फौजदारी कारवाई करणेत येईल याची समज देणेत यावी. वारंवार उल्लंघन होत आहे असे निदर्शनास आल्यास टप्प्या टप्प्याने दंडनीय व फौजदारी कारवाई करावी.
7) जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील पर्यटन स्थळे, सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, स्मारके, संग्रहालये इ. साठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटी व शर्तीसह पर्यटक / नागरिकांसाठी खुले करणेस परवानगी देणेत आलेली आहे. सदर ठिकाणी मास्क नाही तर प्रवेश नाही व आवश्यक सामाजिक अंतर बाळगणे, हात निर्जंतुकीकरण करणे बंधन कारक आहे. याची कडक अंमलबजावणी त्या त्या स्थानिक प्राधिकरण व पोलीस प्रशासनाने करणेची आहे.
8) स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सार्वजनिक ठिकाणी जसे सार्वजनिक शौचालय, बस स्टँड, रेल्वे स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण साधनांचा वापर करुन वारंवार निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात यावी.
9) सर्व खाजगी व्यापारी आस्थापनांनी, शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी दर्शनी भागावर मास्क नाही, प्रवेश नाही, मास्क नाही वस्तु / सेवा वितरण नाही इ. फलक लावावेत व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. मुख्याधिकारी, स्थानिक प्राधिकरणे व पोलीस विभागा मार्फत या निर्देशांचे पालन करणे कामी मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहिम हाती घ्यावी व उल्लंघन करणाऱ्या आस्थापनां विरुध्द प्रथम दंडनिय व त्यानंतर पुन्हा पुन्हा घडणाऱ्या उल्लंघनासाठी फौजदारी कारवाई करावी.
10) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दुचाकी, ऑटो रिक्क्षा, खाजगी प्रवासी बसेस यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सक्तीने मास्कचा वापर करणे बंधनकारक करणेत येत आहे. संबंधीत सक्षम प्राधिकारी व पोलीस विभागामार्फत याच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहिम राबवावी. अटीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व व्यवस्थापकाविरुध्द दंडनिय कारवाई करावी.
11) सर्व खाजगी डॉक्टर यांनी त्यांचेकडे तपासणीसाठी आलेल्या सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविडची तपासणी करणे अनिवार्य करावे. तपासणीमध्ये पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांना अलगीकरण करणे बंधनकारक करावे.
12) महानगरपालिका, नगरपालिका त्याच प्रमाणे ग्रामिण भागासाठी त्या त्या सक्षम आरोग्य यंत्रणेद्वारे एका सकारात्मक चाचणी प्राप्त रुग्णाकरिता त्याच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींची कोव्हिड टेस्ट (रॅपिड ॲटीजेन / आरटीपीसीआर) करण्यात यावी. पॉझिटिव्ह रुग्ण येणारा भाग /एरिया/ प्रभाग यांचा शोध घेवून प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) घोषित करावा. संबंधीत ठिकाणी निर्जंतूकीकरण करावे जेणेकरुन संसर्गाचा प्रसार रोखणे सोपे होईल.
13) नागरी व ग्रामिण शासकीय / निमशासकीय आरोग्य यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणावर ILI व SARI चे रुग्ण शोधणे त्याच प्रमाणे कोविड ची लक्षणे असलेले रुग्ण शोधण्याची त्यांची कोविड चाचणी करणेसाठी आरोग्य पथके नेमावीत व अशा रुग्णांचे अलगिकरण करण्याची कार्यवाही करावी.
14) नागरी व ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेने वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून संबंधित आवश्यक कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हॉस्पिटलमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध राहतील, सर्व उपकरणे सुस्थितीत असतील (व्हेंटीलेटर्स / ऑक्सीजन पुरवठा यंत्रणा) याची खातरजमा करावी. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.
15) वेगाने प्रसार करणाऱ्या (सुपर स्पेडर) संवर्गातील व्यक्तींची वारंवार तपासणी करुन सकारात्मक चाचणी आल्यास अलगिकरण कक्षात ठेवावे.
सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी नमुद केलेल्या सर्व उपाययोजना त्याच प्रमाणे शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी काटेकोर पणे करुन कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे.