कुरुकली कोव्हिड सेंटर सुरू करावे : राजेंद्र सूर्यवंशी
करवीर :
करवीर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कुरुकली परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची गैरसोय होऊ नये , त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी कुरुकली येथील कोव्हिड सेंटर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली.
कोव्हिडच्या पहिल्या लाटेच्या वेळी कुरुकली येथील कोव्हिड सेंटरमुळे पॉझिटिव्ह रुग्णांची चांगली सोय झाली. परिसरातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत झाली होती. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यावर हे सेंटर बंद करण्यात आले होते. आता दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोल्हापूर येथील रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोव्हिड सेंटर पूर्ववत सुरू होण्याची गरज आहे.
तालुक्यातील शिंगणापूर, कुडीत्रे , गोकुळ शिरगाव येथील कोव्हिड सेंटर सुरू आहेत. त्याप्रमाणे कुरुकली परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ या ठिकाणचे सेंटर सुरु होण्याची गरज आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना अटॅक तीव्र आहे, रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे होम आयसोलेशन न करता पॉझिटिव्ह रुग्णांवर कोव्हिड सेंटरमध्येच उपचार झाले पाहिजेत याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कुरुकली ग्रामपंचायतीनेही येथील सेंटर सुरू करावे म्हणून पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी याबाबत तात्काळ पावले उचलून सेंटर सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे.