बिनविरोध : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील सडोलीकर
उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कोण, अध्यक्ष काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा याची बरीच चर्चा जिल्हाभर सुरू होती. अखेर अध्यक्ष पदी आमदार पी. एन.पाटील सडोलीकर यांचे चिरंजीव राहुल पाटील सडोलीकर यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी
यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचा होईल असे सांगितले होते, राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून त्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू होते. काँग्रेसकडूनही अध्यक्ष पदावर दावा कायम होता. दरम्यान पदाधिकारी राजीनामा देण्याअगोदरपासून राहुल पाटील यांनी अध्यक्ष पदांसाठी आग्रही मागणी करत लक्ष केंद्रित केले होते. अखेर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी.एन.पाटील यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राहुल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सदस्य सर्वांत जास्त आहेत. ज्याची सदस्य संख्या जास्त त्याला अध्यक्ष पद यानुसार काँग्रेसला अध्यक्ष तर राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पद देण्यावर तिन्ही नेत्यांत एकमत झाले.
त्यानुसार आज सोमवारी निवड दिवशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी
अध्यक्ष म्हणून राहुल पाटील व उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांच्या नावाची घोषणा केली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीच्या दोन्ही सदस्यांनी अगोदरच राहुल पाटील यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिला होता. विरोधी भाजपनेही राहुल पाटील यांचे नाव पुढे आल्याने निवड बिनविरोध करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे अध्यक्ष निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे काँग्रेसचे राहुल पाटील व राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. दुपारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात निवड सभेत पीठासन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पोवार यांनी नूतन
अध्यक्ष म्हणून राहुल पाटील तर उपाध्यक्ष म्हणून जयवंतराव शिंपी यांची निवड झाल्याचे घोषित केले. या नंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मावळते अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.