संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पवासाचा इशारा
कोकण गोवा मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक घाट या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
मुंबई :
मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलीय.
हवामानतज्ज्ञ आणि हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याची माहिती दिली आहे.
५ जुलै, सकाळी साडे नऊ वाजताची ही परिस्थिती आहे. पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच दक्षिण गुजरातपासून ते अगदी केरळपर्यंत ढगांची चादर दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा तर काही निवडक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे,” असं होसाळीकर म्हणालेत. तसेच पुढे त्यांनी थेट प्रदेशांची नावं घेऊन या परिस्थितीचा परिणाम नेमका कोणत्या प्रदेशांवर होऊ शकतो याचा अंदाज व्यक्त केलाय. “कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट या भागांमध्ये या परिस्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असं होसाळीकर म्हणालेत.
भारतीय हवामान खात्याने येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पावसाची वर्तवली आहे. सध्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरी बरसत आहेत. हीच स्थिती पुढील काही दिवस काय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. खालील फोटोमध्ये मुंबईवरील ढगांची सकाळी १० वाजून ५० मिनिटांची स्थिती पाहता येईल…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.