स्वाभिमानी शेतकरी आंदोलन : शेतकऱ्यांची महामार्गावरच पंगत : निर्णय होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्धार
कोल्हापूर :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दरवाढीसाठी आज गुरुवारी (२३ नोव्हेंबर) आंदोलन पुकारले आहे. शिरोली पुलाची येथे पुणे-बेंगळूरु या राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असून निर्णय होईपर्यंत येथून हटणार नसल्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. सकाळपासून मोठ्या संख्येने शेतकरी संघटित होत आहेत. जमलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनीच जेवणाची केली असून महामार्गावरच शेतकऱ्यांची पंगत बसली आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांसमवेत पंगतीत बसून जेवण केले तसेच पंगतीत शेतकऱ्यांना जेवणही वाढले.
दरम्यान आज छत्रपती शाहू महाराज यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसेच तोडग्याच्या दृष्टीने चर्चाही केली.
नांदणी येथील एका शेतकऱ्यांनी बाजरीच्या सहा हजार भाकरी आणल्या आहेत. सरकार आणि कारखानदार यांच्याबद्दलच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सकारात्मक निर्णयासाठी राजू शेट्टी यांनी तीन पावले मागे येण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ऊस दराच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.