गोकुळमध्ये माझ्या व महाडिकांच्या नावावर एखादे जेवणाचे बिल दाखवा..राजकारण सोडून देईन: आमदार पी. एन.पाटील यांचे विरोधकांना आव्हान
चांगल्या व्यवस्थापनामुळे सत्ताधारी आघाडीला पाठिंबा : समरजितसिंह घाटगे
कागल :
गोकुळने नेहमीच दूध उत्पादक सभासदांचाच विचार केला आहे. पारदर्शक कारभार असल्यानेच गोकुळ नावारूपाला आला आहे. संघ सभासदांच्या मालकीचा राहावा यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहिलो आहोत. महादेवराव महाडिक व माझ्या मालकीचा व्हावा यासाठी कधीच काही केले नाही. गोकुळ संघामध्ये माझ्या किंवा महादेवराव महाडिक यांच्या नावावर एखादे जेवणाचे बिल दाखवा .. राजकारण सोडून देईन, असे खुले आव्हान आमदार पी.एन.पाटील यांनी विरोधकांना दिले.

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या प्राचारार्थ मूरगूड येथील कागल तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आमदार पी.एन.पाटील म्हणाले, दूध उत्पादकांना चांगला दर देण्यासाठी, संघाचा विस्तार वाढविण्यासाठी संघ मल्टिस्टेट करण्याचा प्रयत्न होता. गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाल्याची ओरड विरोधक करत आहेत. जर भ्रष्टाचार झाला असेल तर गोकुळकडे चारशे कोटींच्या ठेवी कोठून आल्या ? असा रोखठोक सवालही त्यांनी उपस्थित केला.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, गोकुळने चांगला कारभार करत सभासदांचे हित जोपासले आहे. गोकुळने कोरोनाच्या अडचणीच्या काळातही दूध बिलाच्या तारखांत कधी बदल केला नाही. गोकुळचे उत्तम व्यवस्थापन असल्यामुळे आपण सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देत आहे.
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील महाडिक संघातून एवढे मिळविले वैगरे खोटेनाटे आरोप करत आहेत. मल्टिस्टेटचा आरोप करणाऱ्यांनी मंडलिक कारखाना मल्टिस्टेट केला हे विसरू नये.
मेळाव्याचे आयोजक ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील मुरगूडकर यांनी गोकुळवर सत्ता प्राप्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. आता तर टोळधाड आली आहे, हे सभासदांना माहिती असल्याने संघ टिकला आहे. शेतकरी संघ, महालक्ष्मी दूध संघाची काय अवस्था झाली याकडेही लक्ष द्यावे असे सुनावले.
यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, अंबरीश घाटगे, विलास पोवार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास माजी आमदार संजयबाबा घाटगे, दत्तात्रय खराडे, दिलीपसिंह पाटील, धनाजी गोधडे, एम.एस.पाटील, शौमिका महाडीक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, उमेदवार, ठरावधारक उपस्थित होते. प्रारंभी विश्वजित पाटील यांनी स्वागत, सदाशिव मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार मधुकर करडे यांनी मानले.