कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात गारपीट झाली . गडिंग्लज,आजरा, पन्हाळा, व काही प्रमाणात करवीर तालुक्यात पाऊस पडला. अर्जुंनवाडा ता कागल येथे गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कलिंगड व शेती पिकाचे नुकसान झाले, या गावात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने , काश्मीर सारख्या बर्फ पडलेल्या गल्ल्या दिसत होत्या.

पन्हाळा व आजरा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. चंदगड कागल मध्ये गारपीट झाली तर गडिंग्लज तालुक्यात वळीव पाऊस जोरात झाला. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
पूर्व मोसमी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.उन्हाचा चटका वाढल्याने तापमानामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे.यामुळे राज्यात तीन दिवस पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी अनेक तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी पडल्या आहेत .
राज्यात मराठवाडा, तामिळनाडू दक्षिण किनारपट्टीलगत तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे . यामुळे राज्यात अनेक भागात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमान मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पूर्व मोसमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
परिणामी राज्यात अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.येत्या दोन दिवसात वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे .
यामुळे राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, या जिल्ह्यात गुरुवार पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे .