गतवैभव आणायला, गोकुळचे वैभव गेलेच कोठे ? शौमिका महाडिक यांचा विरोधकांना सवाल
सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचा हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा
कोल्हापूर :
गेल्या वर्षी कोरोनाने अख्ख जग थांबले, पण गोकुळ थांबले नाही. गोकुळचे प्रत्येक महिन्याचे तीन, तेरा आणि तेवीस तारखेचे बिल कधीच थांबले नाही. सर्वसामान्य दूध उत्पादक , शेतकरी काबाडकष्ट करणाऱ्या महिला यांच्या जोरावर गोकुळने उभारी घेतली आहे. गोकुळ हे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. त्यामुळे गोकुळला गतवैभव मिळवून देण्याची भाषा विरोधक करत आहेत, मात्र गोकुळचे वैभव गेलेच कोठे ? असा सवाल करत विरोधक व्यक्तीद्वेषाचे राजकारण करत असल्याची टीका सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवार शौमिका महाडिक यांनी केली.

गोकुळच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आमदार अमल महाडिक,
यावेळी शौमिका महाडिक पुढे म्हणाल्या, गोकुळच्या अडचणीत पी.एन.पाटील, अरुण नरके, महादेवराव महाडिक कायम एकत्र राहिले. अरुण नरके यांनी सांगितल्याप्रमाणे गोकुळला सलग तीन वर्षे तोटा झाला तेव्हा महादेवराव महाडिक यांची मोठी साथ मिळाली. याठिकाणी पालकमंत्र्यांनी एक दिवस जरी मदत केली असती तर पाटी लावून फिरले असते व गोकुळवर उपकाराची भाषा केली असती, अशी टीकाही त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर केली.
माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, गोकुळ शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत सेवा देत आहे. गोकुळ दूध संघाला कधीही अडचण येणार नाही, इतकी त्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. हा संघ जगात बाराव्या स्थानावर असणारा आहे. अशा संघावर शंका घेऊन चुकीच्या नजरेने पाहणे दुर्दैवी आहे.
माजी चेअरमन अरुण नरके यांनी , गोकुळ हा चांगलाच चालला आहे. तो कसा चालतो हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संघाबाबत आणि संघाच्या कार्यप्रणालीबाबत इतर कुणी माहिती देण्याची गरज नसल्याचे सांगितले.
माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी, ज्यांनी स्वतः स्थापन केलेले दूध संघ बुडवले, त्यांचीच मुले आता गोकुळ चालविण्यासाठी गोकूळच्या रिंगणात उतरली असल्याचा टोला मारला.
मेळाव्याला माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आमदार अमल महाडिक, जि.प.सदस्य अरुण इंगवले, सर्जेराव माने, सुरेश पाटील, दिलीप पाटील, पॅनेलचे उमेदवार बाळासाहेब खाडे, रणजित पाटील, अनुराधा पाटील, प्रताप पाटील -कावणेकर यांच्यासह ठरावधारक उपस्थित होते.