कोल्हापूर :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करून भाजपला
शह देण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे समितीचा कार्यभार एक वर्षासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे समितीच्या अध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचा या समितीत समावेश असल्याने ही समिती ताकदीची मानले जाते. तसेच या समिती अध्यक्ष पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असल्याने ते प्रतिष्टेचे बनले आहे. त्यामुळे या पदावर अनेक जण इच्छुक असतात.
भाजप सरकार सत्तेत आल्यावर तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निकटवर्ती महेश जाधव यांची २०१७ ला या समितीचे अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे भाजपचे जाधव यांच्या पदावर टांगती तलवार होती. अखेर दीड वर्षांनी आघाडी सरकारने समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या नूतन अध्यक्ष, व सदस्य यांची निवड केली जाणार आहे. या पदाकरिता
संजय डी. पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी महापौर सागर चव्हाण केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने आदींची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.