राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक
करवीर :
तंत्रज्ञानाचा उपयोग करून संघटन वाढीसाठी व माहितीची देवाण घेवाण होण्यासाठी उपलब्ध सोशल मिडीया साधनांचा वापर करून जिल्हयातील एक लाख तरूणांचे जाळे तयार करण्याचा निर्धार अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी जाहिर केला. कुडित्रे येथे झालेल्या करवीर तालुका कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नुतन जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष भेटीगाठी, सभा, मेळावे व बैठकांना मर्यादा आल्या आहेत. अशावेळी संघटनात्मक कामांसाठी संवादाचा अभाव जाणवत आहे. तसेच समाजाचे प्रश्न व्यासपीठांवरून मांडण्यासाठी देखील अडचणी येत आहेत. यासाठी उपाय म्हणुन सोशल मिडियावर ग्रुप बनवणे, ऑनलाईन मिटींग घेणे, ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करणे असा कार्यक्रम हाती घेवून सामाजिक प्रश्नांसाठी व्यासपीठ खुले केले जाणार आहे. याव्दारे मराठा आरक्षण सद्य स्थिती समाजापर्यंत पोहचणे, आण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळ व सारथी संस्थेविषयी माहिती गरजुंपर्यंत प्रसारित करणे असा उपक्रम राबविला जाईल.
यावेळी बोलताना शशिकांत पाटील म्हणाले, जिल्हाभर असलेले महासंघाचे जाळे अजुन घट्ट करण्यासाठी उर्वरित गावांमध्ये शाखांचे जाळे निर्माण करण्याबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संघटन करून विद्यार्थी शाखांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी महासंघ प्रयत्नशील राहील. सभेला करवीर तालुका अध्यक्ष राजेंद्र खेराडे, जिल्हा युवक अध्यक्ष अवधुत पाटील, शहर युवकाध्यक्ष इंद्रजीत माने, सरदार पाटील, सतेज पाटील, कुंडलिक पाटील, मिलींद चव्हाण, रामचंद्र पोवार, डॉ. इंद्रजित पाटील, जोतिराम पाटील, दिपक पाटील, लखन भोगम आदीसह कुडित्रेसह, वाकरे, दोनवडे, शिंदेवाडी, खुपिरे, भामटे, कोपार्डे, आडूर, कळंबे, कोगे, सावर्डे दु।। आदी भागातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ जगदाळे यांनी केले तर सुत्रसंचालन दिपक चौगले यांनी केले आभार सरदार पाटील यांनी मानले.