पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती
करवीर :
कोल्हापूरच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. बालिंगे पाणीफिल्टर हाऊसच्या शेजारी चंबूखडीच्या पश्चिम भागात येथे पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती आहे. आता ही गळती मोठी गळती झाली आहे. या फुटलेल्या पाईपलाईनचे कारंजे सुमारे ४० फूट उडत आहेत. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
याठिकाणी महिन्याभरापूर्वी गळती लागली आहे ,पण अद्यापही गळती काढलेली नाही . आताही गळती मोठी झाली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गळती लागली की तात्पुरती मलमपट्टी केली जाते, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पाईप फुटते.असे रहाटगाडगे आजपर्यंत असेच सुरू आहे. याचा फटका कोल्हापूर शहरवासीयांना कायमच बसत आहे. कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गळतीमुळे महापालिकेचा भोंगळकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
बालिंगे फिल्टर हाऊसच्या शेजारी चंबूखडीकडे जाणाऱ्या या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. नागदेववाडी मार्गे चंबूखडी येथे जाताना चार ते पाच ठिकाणी कारंज्यासारखे पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. यामुळे दिवसाही या रस्त्यावर पावसाचा अनुभव येतो आहे.
दररोज लाखो लिटर पाणी वाया जातच आहे. शिवाय शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. सततच्या पाण्याने नजीकची शेती धोक्यात आली आहे. ताबडतोब येथील पाईपलाईनची गळती काढावी व शेतीचे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे.