पोटाला चिमटा काढून चिमण्या जगविणारा हा राम….
जागतिक चिमणी दिन विशेष
टीम ग्लोबल
कोल्हापूर :
जातीने लमाण समाजाचा असणारा हा राम, दरवर्षी पुरात घर बुडणारे,आणि
दरवर्षी पुराने घर पडणारे, असा हा भूमिहीन शेतकरी राम ,
रोज फक्त दोन वेळ पोट भरेल अशी बिकट परिस्थिती असणारा हा राम, डोक्यावर छप्पर नाही, पोटाला अन्न नाही, तरीही पशुपक्ष्यांसाठी पोटाला चिमटा काढून काम करणारा हा राम, दररोज सुमारे अडीचशे चिमण्या सांभाळतो, या पर्यावरण प्रेमी
अवलियाची ही कहाणी आहे.


दोनवडे ता. करवीर येथे रामचंद्र पवार आणि पत्नी पुतळाबाई पवार हे एका मुंलग्यासह हे कुटुंब रहाते. भूमी हिन असणारा हा राम,व पत्नी मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. निसर्गाशी आणि पर्यावरणाशी एकरूप झालेले हे कुटुंब व हा राम नेहमी पशुपक्षांच्या जगण्यासाठी धडपड करत असते.
गावाच्या पूर्वेला एक छोटीशी झोपडी, पाल उभा करून येथे हे कुटुंब राहत आहे. लहानपणापासून पशुपक्ष्यांची आवड असणारा राम गेली दहा वर्ष दारात येणाऱ्या चिमण्यांना तांदूळ टाकतो.गावातील चिमण्या आणि रानातील सुगरण अशा चिमण्या सकाळी साडे पाच वाजता राम यांच्या पत्र्यावर येऊन चिवचिवाट करतात. यामुळे सकाळी कुटुंबाला जाग येते. आणि सुरु होतो तो किलबिलाट.जो सुरुवातीला उठेल त्यांने दोन हातात दोन मुठी तांदूळ घ्यायचे आणि दारात नेऊन टाकायचे, हा त्यांचा कुटुंबाचा नित्याचा नियम आहे.त्यानंतर चिमण्या दिवसभर रानावनात जाताना दिसतात. पुन्हा राम यांच्या घराच्या जवळच असणाऱ्या झाडाझुडपात या चिमण्या राहण्यासाठी येतात. पुन्हा सकाळी चिमण्यांचा किलबिलाट सुरू होतो.
घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तीन वेळचे अन्न मिळणे मुश्कील आहे. अशा परिस्थितीत जे मिळते ते रेशन धान्य यामधील ६० ते ७० टक्के धान्य या चिमण्यांना टाकून संपते.
घरातील तांदूळ संपल्यास वेळप्रसंगी, परिस्थिती बेताची असतानाही विकत तांदूळ घेऊन चिमण्यांच्या साठी ठेवले जाते. अशा रोज सुमारे अडीचशे चिमण्या त्यांनी जगविण्याचे,पर्यावरण वाचविण्याचे काम केले आहे.
दरम्यान पुराच्या ठिकाणी त्यांचे घर असल्यामुळे दरवर्षी पुरात घर बुडले जाते. आणि दरवर्षी पुरामुळे घर पडते, गेली अनेक वर्षे मागणी करूनही त्यांना घराचे अनुदान मिळाले नाही. अशा पडक्या घरात राहून, पोटाला चिमटा काढून चिमण्या जगविण्याचे काम राम सातत्याने करत आला आहे.
आपणही देऊ शकता चिमण्यांसाठी धान्य,
पशुपक्षी पर्यावरण प्रेमी यांनी,या चिमण्यांसाठी धान्य देण्याचे असेल, तर प्रत्यक्ष येऊन चिमण्या पहाव्या आणि जमेल ते धान्य द्यावे.