ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करा, अन्यथा काम रोखू : राजेंद्र सूर्यवंशी ( बीडशेड येथे बालिंगा – दाजीपूर रस्यासंदर्भात परिसरातील पदाधिकाऱ्यांची बैठक )
करवीर :
बालिंगा – दाजीपूर रस्ते कामासाठी या मार्गावर बाजूपट्ट्या व रस्ता खोदाईचे सुरु आहे. मात्र हे करत असताना संबंधित गावचे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मनमानी पद्धतीने काम सुरु आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. धुळीचे लोट पसरून श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करा, अन्यथा काम रोखू, असा इशारा माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला.
बीडशेड येथील सूर्यवंशी गॅरेज येथे बालिंगा – दाजीपूर रस्तेमार्गाच्या नियोजनशून्य कामामुळे ग्रामपंचायत, शेतकरी व ग्रामस्थ यांना येणाऱ्या अडचणी व समस्यासंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. राज्य महामार्ग एमएसआयडीसीचे टीम लीडर प्रदीप तिवारी, प्रोजेक्ट मॅनेजर वीरेंद्र बिर्ला ,रेसिडेंट इंजिनियर सागर देशमुख उपस्थित होते. यावेळी सरपंच, शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, चुकीच्या पद्धतीने कामे सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वाहतूक धोक्याची बनत आहे. पर्यायी मार्ग नीट केलेले नाहीत. गावात रस्त्याची उंची वाढवता कामा नये. धुळीमुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. नळपाणीपुरवठा व शेतीसाठी विद्युत पाईपलाईनची मोडतोड होत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्याकडे ठेकेदार व कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी काम करू देणार नाही. तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
राज्य महामार्ग एमएसआयडीसीचे टीम लीडर प्रदीप तिवारी यांनी, धूळ रोखण्यासाठी सकाळ ,दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळा टँकरने पाणी मारून उपाययोजना करण्यात येईल.तसेच शेतकऱ्यांच्या फुटलेल्या पाईपलाईन बसवून देण्यात येईल. तसेच बाकीच्याही समस्या कमी करू, असे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच तानाजी पालकर (पाडळी खुर्द), सरपंच भगवान रोटे (सावर्डे दुमाला), सरपंच सातापा सुर्वे (चाफोडी), सरपंच कृष्णात सुतार (मांडरे),उपसरपंच आकाराम जाधव (सावरवाडी), गजानन खोत, धनाजी खाडे, जगदीश पाटील, घानवडेचे माजी सरपंच यशवंत पाटील, बंडोपंत पाटील, मांडरेचे बळवंत पाटील, कंथेवाडीचे माजी सरपंच एकनाथ पाटील,गणेशवाडीचे सरपंच सारिक शिवाजी माने, मच्छिंद्र कांबळे यांचेसह पदाधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.