राधानगरी :
सध्या ज्येष्ठ नागरिक व अबाल वृद्धांना कोविशिल्ड लस देण्याची मोहीम सुरू आहे. मात्र ही लस प्राथमिक आरोग्य केंद्राएवजी उपकेंद्रावर व प्रत्येक गावात जाऊन देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे समनव्यक सुशील पाटील (कौलवकर) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेली वर्षेभर कोरोना महामारीने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गतवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. शासनाने कोविशिल्ड लसीकरणद्वारे महामारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राधानगरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड
लसीचे लसीकरण येत्या चार दिवसांत सुरू होणार असून प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिला जाणार आहे. मात्र त्यांना आबालवृद्धांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यन्त नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना या लसीकरण मोहिमेला मुकावे लागणार आहे. गरीब अबाल वृद्धांना या लसीपासून वंचित राहावे लागणार आहे.
यासाठी शासनाने सदरची लस प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी उपकेंद्रात तसेच प्रत्येक गाव वाडीवस्तीवर जाऊन करण्याची मागणी सुशिल पाटील कौलवकर, भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, केरबा दत्तात्रय पाटील, सुभाष पाटील (सिरसेकर),वसंतराव पाटील (सिरसेकर),शहाजी कवडे, सर्जेराव कवडे,तुकाराम धामणे (तरसंबळे), भोगावतीचे संचालक संजयसिह पाटील,रवींद्र पाटील,जयवंत कांबळे, मोहन डवरी, प्रा. ए. डी. चौगले, माजी सरपंच शौकत बक्षु, डॉ.सुभाष पाटील (आमजाई व्हरवडे) आदीनी केली आहे.