राधानगरी :
केडीसीसी बँकेच्या माध्यमातून आमदार पी.एन. पाटील यांनी शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतच्या कर्जाला व्याज माफी करण्यासाठी केलेला पाठपुरावा, त्याच धर्तीवर राज्य सरकारकडेही मागणी करून राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जाला व्याजमाफी देण्यासाठी केलेला पाठपुरावा तसेच रेंगाळलेल्या धामणी प्रकल्पाला १०० कोटी रुपये निधी उपलब्धतेसाठी केलेल्या कार्याबद्दल भोगावती कारखान्याच्या वतीने उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांच्या हस्ते आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक कृष्णराव किरूळकर हे होते.
यावेळी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार पी.एन.पाटील सडोलीकर म्हणाले,
राज्यातील महाआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून शेती कर्जावरील व्याज माफीच्या कोल्हापूर पॅटर्न राज्यभर लागू झाला आहे. धामणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
शेतकऱ्यांच्या दहा लाख रुपयांच्या खर्चाला व्याजमाफी मिळावी, अशी आग्रहाची मागणी राज्य शासनाकडे केली होती. शासनाने तीन लाखापर्यंत कर्जाला व्याज माफी देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसेच धामणी प्रकल्पालाही भरीव निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हा प्रकल्पही जलद गतीने पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले.
प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सर्व संचालक, ,कार्यकारी संचालक के.एस.चौगुले शिवाजीराव कवठेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.