करवीरचा आमदार राहुल पाटीलच : आमदार सतेज पाटील (राहुल पी.पाटील यांचा वडणगेतून प्रचाराचा शुभारंभ, सभेला प्रचंड गर्दी, निष्ठावंतासाठी निष्ठावंत सरसावले)
कोल्हापूर :
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल पी.एन.पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ वडणगे येथील शिव पार्वती मंदिरातून खासदार शाहू छत्रपती महाराज व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आला. यावेळी राहुल पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. सभा स्थळी कार्यकर्त्यांनी आम. सतेज पाटील, राहुल पाटील यांना खांद्यावरून उचलून व्यासपीठापर्यंत नेत जंगी स्वागत केले. निष्ठावंत स्व. पी.एन.पाटील यांच्या माघारी राहुल पाटील यांच्या विजयासाठी काँग्रेस, उबाठा, शरद पवार गट व समविचारी पक्षाचे निष्ठावंत सरसावल्याचे प्रकर्षाने दिसून येत होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील म्हणाले, स्व. पी.एन. पाटील यांनी करवीरचा विकास करून राज्यात करवीरला प्रतिष्ठा मिळवून दिली. हाताच्या फोडाप्रमाणे कार्यकर्ते जोपासले. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात व मनात स्व.पी.एन.आहेत. त्यामुळे निष्ठावंत नेत्याच्या माघारी राहुल पाटील यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहूया. राहुल पाटील यांना आमदार करायचचं असा ठाम विश्वास दिला. तसेच सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी अजूनही फडणविसांनी माफी मागितली नसल्याची टीका केली.
खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, आपल्या प्रत्येक कार्यात पी.एन.यांनी पक्षनिष्ठा जोपासली. लोकसभा निवडणुकीत गाव अन गाव पिंजून काढून मला दिलेले मताधिक्य कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे करवीर – पन्हाळा – गगनबावड्यातील जनतेने लोकसभेपेक्षा ज्यादा मताधिक्य देऊन राहुल पाटील यांच्या हात चिन्हासमोर बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवूया.
उमेदवार राहुल पाटील म्हणाले, वडिलांच्या निधनानंतर आपण सर्वजण वडीलकीच्या नात्याने माझ्या पाठीशी राहिलात. उमेदवारी यादीतील माझे नाव हे माझे नसून स्व. पी.एन. पाटील व त्यांच्या करवीरच्या जनतेचे आहे. उमेदवारी अर्ज भरताना स्व. साहेबांचा फोटो घेऊन उंचावताना पाहून निष्ठावंतांच्या डोळ्यात मला जे प्रेम दिसले ते कधीही विसरणार नाही. वडिलांची पक्षनिष्ठा व कार्यकर्त्यांवरील प्रेम त्याच ताकदीने जोपसणार, जनसेवेसाठी कायम उपलब्ध राहणार असा मनोदय व्यक्त केला.
शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील (बापू ) म्हणाले, स्व.पी.एन. आणि मी उभा संघर्ष केला. मात्र एकमेकांवर बोलताना संस्काराची पातळी कधीच सोडली नाही. नीतिमत्ता जोपासली. दोघांनी एकमेकांच्या हातात हात घातला तेव्हाच वैर सोडून दिले.या भेटीत त्यांनी अगोदर माझ्या तब्येतीची चौकशी केली. पी. एन.यांनी सुसंस्कृत राजकारण केले. उसने अवसान आणून नीतिमत्ता जोपासता येत नाही. त्यांनी ४० वर्षे काँग्रेसचे एकनिष्ठेने कार्य केले. राहुल पाटलांच्या विजयाची नैतिक जबाबदारी आता सर्वांची असल्याचे आवर्जून सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील म्हणाले, २०१९ ला याच मैदानावर पी. एन. पाटील यांच्या प्रचाराचा विजयी शुभारंभ झाला होता. त्याच विजयाची पुनरावृत्ती आता होणार हे निश्चित आहे. सर्वांनी नातीगोती, गटतट न पाहता निष्ठेने
प्रचार करून राहुल पाटील यांना विजयी करूया.
यावेळी डॉ. चेतन नरके, राजेंद्र सूर्यवंशी, अमर पाटील शिंगणापूरकर, आरपीआयचे पांडुरंग कांबळे तानाजी आंग्रे, अपर्णा पाटील, राज वैभव, सुनील पाटील, मानसिंग पाटील, संदीप पाटील, दादू कामिरे, सागर पाटील, कु. समृद्धी गुरव आदींची भाषणे झाली. आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, उबाठा जिल्हाप्रमुख संजय पवार, राजेश पाटील, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, पी. डी. धुंदरे, केरबा पाटील, उदयानी साळुंखे, बी.एच. पाटील, क्रांतिसिंह पवार पाटील, बाजीराव पाटील (नाना), बंकट थोडके, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, डी. जी. भास्कर, बबनराव रानगे, बजरंग पाटील, शशिकांत आडनाईक, भरत मोरे , शाहू काटकर, बाबासो देवकर, एम.जी.पाटील यांच्यासह आघाडीचे मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच सचिन चौगले यांनी केले तर आभार करवीर तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.
—————————
राहुल पाटील आमदार हेच लक्ष..
करवीर ही माझी कर्मभूमी आहे. तुमच्यामुळेच मी मोठा झालो. तुमच्यासाठी नेहमी कार्यरत राहिलो आहे. या निवडणुकीत कोणीही हेवेदावे, रुसवे-फुगवे आणायचे नाही. काय अडचण आली तर मी व शाहू महाराज लागेल तेथे उभे आहोत. काळजी करायचे कारण नाही. करवीरमधून राहुल पाटील यांना आमदार करणे हे एकच लक्ष आता आहे असे सांगून सर्वांनी झटून कामाला लागण्याची सूचनाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील यांनी केली.
—————————
गद्दारांना गाडण्याचा ‘उबाठा ‘ चा निर्धार…
उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पेटून उठल्याचे दिसून येत आहेत. सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, तानाजी आंग्रे, अरुण मांगलेकर, मंजित माने, सुरेश पवार आदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर टीकास्त्र सोडत मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांना गाडण्याचा तसेच वडणगे, शिये जि.पं. मतदारसंघातून राहुल पाटील यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी’ उबाठा ‘ च्या वतीने राहुल पाटील यांना शाल व श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
—————————————————————