स्व.पी.एन.यांच्या रूपाने राहुल पाटील यांना विधानसभेत पाठवूया : आम. धीरज देशमुख ( वाकरे येथे युवा संवाद मेळावा, युवकांची मोठी गर्दी, राहुल पाटील यांनी साधला युवकांशी संवाद
कोल्हापूर :
स्व.पी.एन.पाटील यांनी संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी, पक्षासाठी वाहिले. त्यांचे मतदारसंघातील व जिल्ह्याच्या सहकारातील कार्य आदर्शवत असेच आहे. पी.एन.यांनी जी माणसे, जे कार्यकर्ते जोडले हीच राहुल यांची मोठी शिदोरी आहे. ज्यांच्या सातबाऱ्यावर पी.एन.यांचे नाव आहे असे राहुल जनसेवेसाठी कोठेच कमी पडणार नाहीत. राहुल पाटील हे उद्याचे पी.एन.असणार आहेत. आता ही सगळी जबाबदारी आपली आहे. पी.एन.यांच्या रूपाने राहुल पाटील यांना विधानसभेत पाठवूया, असे आवाहन आमदार धीरज देशमुख यांनी कले.
वाकरे फाटा (ता. करवीर) येथील विठाई चंद्राई सांस्कृतिक हॉल येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
युवा संवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी स्व. पी एन पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नवमतदर, युवक – युवतीनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल पाटील यांनी मनमोकळी उत्तरे देऊन युवकांची मने जिंकली. जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, सौ. तेजस्विनी राहुल पाटील यांची उपस्थिती होती.
आम. धीरज देशमुख पुढे म्हणाले, स्व. विलासराव देशमुख – स्व.पी.एन.पाटील हा दोस्ताना राज्याला माहित आहे. वडिलांच्या पश्चातही विधानसभा सभागृहात ज्येष्ठ असूनही पी.एन.आमच्या शेजारी बसायचे आणि जणू मी यांच्या पाठीशी आहे हे राज्याला व पक्षनेतृत्वाला दाखवून द्यायचे. पाच दशकापासून कोल्हापूर – लातूरचा जिव्हाळा यापुढेही देशमुख – पाटील परिवार जपेल हा विश्वास देतो.दोन पाटील बंधूसाठी लागेल तेथे आम्ही देशमुख बंधू आणि पक्षही खंबीरपणे उभे राहणार. करवीरचा आमदार राहुल पाटीलच असणार. कोल्हापूर हा भाजपमुक्त जिल्हा होणार असल्याची टीकाही केली.
राहुल पाटील म्हणाले, वडील स्व.पी.एन. साहेबांचे विधानसभेचे कामकाज, समाजकारण – राजकारण जवळून पाहिले आहे. जिल्हा परिषदेमुळे जिल्ह्याचे काम करण्याची संधी मिळाली. १० वर्षे रखडलेला धामणी प्रकल्प पी.एन.साहेबांमुळे मार्गी लागला. वडिलांच्या विचाराने अहोरात्र जनतेसाठी कार्यरत राहणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
प्रास्ताविक डॉ. लखन भोगम यांनी केले. प्रभाकर पाटील, प्राजक्ता पाटील, प्रमोद पाटील यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघातील युवक युवती, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————
…अन राहुल पाटलांना अश्रू अनावर :
स्व.पी.एन. यांच्या आठवणींना उजाळा देताना राहुल पाटील यांचा कंठ दाटून येत होता. वडिलांनी आयुष्यभर जनतेचे काम केले. ज्या निष्ठेने त्यांनी पक्षावर, कार्यकर्त्यांवर प्रेम केले त्याच निष्ठेने आयुष्यभर कार्य करीन हे सांगताना राहुल पाटील यांना अश्रू अनावर झाले. हे पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी उभारले.
—————————————————————–
९२९२ हेल्पलाईन नंबर व्हावा…
स्व.पी.एन. पाटील यांनी मोठे कार्य केले आहे. एक कॉल प्रॉब्लेम सॉल ही त्यांच्या कार्याची ओळख जनमाणसाची मनावर आजही रुंजी घालत आहे. जनकल्याणासाठी अहोरात्र कार्यरत असणारा त्यांचा ९२९२ नंबर हा हेल्पलाईन नंबर व्हावा, अशी अपेक्षा आम. धीरज देशमुख यांनी व्यक्त केली.
—————————————————————-