वचनपूर्ती स्व.आम.पी.एन.पाटील यांच्या शब्दाची : भोगावती कारखान्यातर्फे ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेची ‘ हत्तीवरून मिरवणूक’ (१ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार )
कोल्हापूर :
भोगावती कारखान्याच्या वतीने आयोजित एका सत्कारप्रसंगी तत्कालीन चेअरमन काँग्रेसचे स्व. आमदार पी.एन पाटील सडोलीकर यांनी स्वप्नीलचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना ‘ स्वप्नील, ऑलिम्पिकला पदक मिळव, तुझी हत्तीवरून मिरवणूक काढतो’ , असा शब्द दिला होता. स्वप्नीलने ऑलिम्पिकला पदक मिळविताच शब्दाला जागणाऱ्या आपल्या नेत्याच्या पश्चात त्यांनी दिलेला शब्द सत्यात उतरविण्याचे कार्य जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील सडोलीकर व भोगावती साखर कारखान्याचे संचालक मंडळ यांनी पूर्ण केले. ही मिरवणूक पाहण्यासाठी पी.एन.साहेब हवे होते अशीच भावना प्रत्येकजण व्यक्त करत होते.
भोगावती साखर कारखान्याच्या वतीने ऑलिम्पिकवीर स्वप्नीलची हत्तीवरुन ढोल ताशाच्या गजरात, लेझीम – मर्दानी खेळ व हलगीच्या कडकडाटात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. स्वप्नीलने भोगावती कारखान्यावरील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेला १ लाख ५१ हजार रूपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वप्नीलचे आईवडील, प्रशिक्षक, भोगावती कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, व्हा. चेअरमन राजु कवडे, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळचे संचालक आर. के. मोरे, बाळासाहेब खाडे, राधानगरी काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले, शेकापचे केरबा भाऊ पाटील, अक्षय पाटील सडोलीकर, जनता दलाचे वसंतराव पाटील, यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, भोगावती खोऱ्यातून शेकडोच्या संख्येने आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.