करवीर तालुक्यात नवागतांचे जल्लोषात स्वागत : पहिलीसाठी २९६२ विद्यार्थी दाखल, मुलांनी शाळा परिसर फुलला
कोल्हापूर :
प्रदीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शनिवारी (दि.१५) सकाळी करवीर तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली आणि शाळेचा परिसर चिमुकल्यांनी गजबजून गेला. सर्वच शाळामध्ये पहिली प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही व अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. अनोख्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत झाल्याने चिमुकले विद्यार्थीही आनंदित होते. करवीर तालुक्यात पहिल्याच दिवशी पहिलीसाठी २९६२ विद्यार्थी दाखल झाले.
जिल्हा परिषद कोल्हापूर व करवीर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन शाळा स्वच्छता, गृहभटी कार्यक्रम सुरु होते. गावागावांत शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शनिवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविला गेला. नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होताच शिवाय शाळेतील उत्साही वातावरण पाहून हा आनंद अधिकच वाढलेला दिसत होता. पहिल्याच दिवशी शाळेत जायला रडणारी मुलेही आगतस्वागत पाहून खुश दिसत होती. मुलांना शाळेत सोडायला पालकांची लगबग सुरूच होती.
शाळांमध्ये प्रथम नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन, रंगबेरंगी फुगे देऊन वाजतगाजत स्वागत करण्यात आले. ढोलताशे, हलगी, लेझीम आदी वाद्यासह फटाके वाजवून गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. काही काही गावांत रथातून, सजविलेल्या वाहनातून संवाद्य फेरी तसेच हातात रंगबीरंगी फुगे, डोक्यावर रंगीत फेटे, गांधी टोपी लक्ष वेधत होते. आमची शाळा.. लय भारी, मुलगा मुलगी एकसमान – दोघांनाही शिकवा छान, ज्ञानाच दिवा घरोघरी, ज्ञान तेथे मान आदी घोषणा दणाणत होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच शालेय पोषण आहारात गोड पदार्थ वाटप करण्यात आला. करवीर तालुक्यातील नंदवाळ प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमास गटविकास अधिकारी विजय यादव, गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांनी सहभाग घेतला. गावागावातील या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित व सामाजिक कार्यकर्ते, पालक उपस्थित होते.
————-
गुढीपाडव्याच्या नोंदीपेक्षा अधिक मुलांचा प्रवेश….
गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्हा परिषद शाळात पाहिलीत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची नावे नोंद केली जातात. करवीर तालुक्यात गुढीपाडव्याच्या दिवशी पहिलीसाठी एकूण २४१९ मुलांची नोंद झाली होती. मात्र आज पहिल्याच दिवशी १५३३ मुले व १४२९ मुली अशी एकूण २९६२ विद्यार्थी पहिलाला दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतगु ढीपाडव्याच्या नोंदीपेक्षा अधिक मुलांचा प्रवेश झाल्याचे दिसते.