अमेरिकेत होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा विशेष कार्यक्रमास छत्रपती संभाजीराजे प्रमुख अतिथी

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात प्रतिवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी अत्यंत मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या सोहळ्याने आज लोकोत्सवाचे स्वरूप धारण केले आहे. भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन असणाऱ्या या दिवसाची प्रेरक स्मृती सदैव जीवंत राहावी व शिवराज्याभिषेकाचे क्रांतिकारी महत्त्व हे जगभर पोहोचावे, हेच हा सोहळा साजरा करण्यामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे छत्रपती संभाजीराजे वेळोवेळी सांगतात व त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील असल्याचेही अधोरेखित करतात.

आता या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत असून अमेरिका मधील लॉस एंजेलिस या शहरात स्थायिक भारतीयांच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार (SMAP) या संस्थेच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमास छत्रपती संभाजीराजे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असून शनिवार, दि. २२ जून व रविवार, दि. २३ जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी दि. २२ रोजी असणाऱ्या ग्लोबल लीडरशीप समिटला छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. या समिटला संपूर्ण अमेरिकेतून उद्योग, व्यवसाय, कला व साहित्य क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रविवार, दि. २३ रोजी लॉस एंजेलिस या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसह संभाजीराजे यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात येणार असून या शोभायात्रेस अमेरिकेच्या विविध भागांत स्थायिक असणारे हजारो भारतीय नागरिक उपस्थित राहणार आहेत.

याविषयी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, अशा कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांची राष्ट्रभक्तीची व स्वातंत्र्याची प्रेरणा जगभर पोहोचत आहे याचा आनंद वाटतो. ज्या उद्देशाने आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरूवात केली होती, तो उद्देश आज सफल होताना पाहून आणि त्याचा भाग होताना एक वेगळाच अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर पोहोचविण्यासाठीच मी आयुष्यभर कष्ट करीत राहणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!