राहुल पाटील लढणार करवीर विधानसभा : मोठे बंधू राजेश पाटील यांनी केली घोषणा
कोल्हापूर :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवतील, अशी घोषणा त्यांचे मोठे बंधू श्रीपतरावदादा बोंद्रे बँकेचे चेअरमन राजेश पाटील यांनी दादा बँकेच्या प्रधान कार्यालयात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
रविवारी दुपारी १२ वाजता दिवगंत आमदार पी एन पाटील यांच्या करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्यातील समर्थकांनी वाकरे फाट्यावरील विठाई – चंद्रार्ड लॉनवर मेळावा झाला. प्रचंड गर्दीने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकनिष्ठतेची शपथ घेऊन आमदार पाटील यांचे दोन्ही चिरंजीव राजेश – राहूल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
मेळाव्यानंतर गोकूळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ पाटील कुटुंबीयांना कळवला. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे, आता तुम्ही विधानसभेचा निर्णय चर्चेने घ्यावा अशी विनंती केली. तेव्हा दोन पाटील बंधू आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात याबाबत चर्चा झाली.
सायंकाळी ७ वाजता दादा बँकेच्या कार्यालयात प्रत्रकार परिषदेत राजेश पाटील यांनी करवीर विधानसभेसाठी राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी राहुल पाटील म्हणाले, आमदार पी.एन. पाटील साहेबांचे काम मोठे होते. त्यांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्यासाठी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, साहेबांचे सर्व जुने नवे, लहान मोठे सर्व कार्यकर्ते, समविचारी, आघाडीचे सर्व घटक पक्ष यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत असे सांगितले.
पत्रकार परिषदेला गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, भोगावतीचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, इंद्रजित बोंद्रे, प्रा. आर.के.शानेदिवाण, बी एच पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकरराव पाटील, राजकिरण मोहिते, शिवाजी कवठेकर, संदीप पाटील, रणजित पाटील, शिवाजी कारंडे, चेतन पाटील, स्वप्नील नवाळे, समीर रेणुसे, कृष्णात चाबूक, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.