लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा : महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी शासनाने २ हजार कोटी द्यावेत : संभाजीराजे छत्रपती
रायगड :
दुर्गराज किल्ले रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साही, मंगलमय वातावरणात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड यावेळी दुमदुमून गेला होता.
आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने गेले अनेक वर्षे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.
देशभरातून आलेले शिवभक्त छ.शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत होते, संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोप वे परिसर शिवमय झाला होता . हातात भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्त संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत होते. महिला मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेत सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या, आज पहाटे श्री जगदीश्वर मंदिरात मध्ये विधिवत पूजन करण्यात येऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली. गडावर वाजणारे ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला होता. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनी देखील दाद दिली. यामुळे गडावर प्रत्यक्ष शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मॉसाहेब यांची पालखी ढोल ताशांच्या गजरामध्ये जय जय कार करीत, वाजत गाजत राजसदरेवर आणल्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती, यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करून सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजसदरेवरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्यावर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला . यावेळी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती राजसदरेवर उपस्थित होत्या.
गुरुवारी पहाटे श्री जगदीश्वर मंदिरात मध्ये विधिवत पूजन करण्यात आली त्यानंतर सकाळी सात वाजता शहाजीराजे यांच्या हस्ते नगारखाना येथे ध्वजपूजन व ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली. गडावर वाजणारे ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला होता. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनी देखील दाद दिली. यामुळे गडावर प्रत्यक्ष शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता. लाखो शिवभक्तांचा उत्साह पहाटेपासून टिपेला गेला. शाहिरांनी डफ, तुणतुणे व ढोलकीच्या ठेक्यावर पोवाडे सादर करत शिवशौर्याचा जागर घातला.खांद्यावर भगवा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी, कपाळाला अष्टगंध लावून शिवभक्त जल्लोष करत होते.
पोलिसांकडून मानवंदना..
पोलिसांकडून महाराष्ट्र गीताची धून वाजवत मानवंदना देण्यात आली. मुख्य समारंभानंतर शिवरायांच्या पालखीची राजसदरेपासून जगदीश्वर मंदिर ते शिवसमाधी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हेलिकॉप्टर द्वारे शिवराज्याभिषेक स्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली.
लाखो शिवभक्तांनी घेतला अन्नछत्राचा लाभ..
शिवभक्तांच्या सोयीसाठी अन्नछत्र, आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या. याचा लाखो शिवभक्तांनी लाभ घेतला गडावर येताना व जाताना गर्दी होऊ नये यासाठी शेकडो पोलीस गर्दी नियंत्रण करत होते.
शिवभक्तांसाठी मोफत बस सेवा..
गडाच्या खाली वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी गडापासून पाच किलोमीटर अगोदरच शिवभक्तांची दुचाकी व चार चाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था केली होती. तेथून गडाच्या पायथ्यापर्यंत नि: शुल्क एसटी सेवा देण्यात आली.
राबले हजारो हात..
शिवराज्याभिषेक समितीच्या हजारो स्वयंसेवकांनी शिवभक्तांसाठी रात्रंदिवस सेवा दिली. यामध्ये कुठेही गडावरील शिस्त बिघडू नये याची काळजी घेण्यात आली. पोलीस यंत्रणा व शिवभक्तांच्या मध्ये दुवा म्हणून ही काम केले.
महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी शासनाने २ हजार कोटी द्यावेत : संभाजीराजे छत्रपती
राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाकडे गड किल्ल्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली. ही मागणी पुढील पाच वर्षासाठी आहे. रक्कम कधी देणार हे सरकारने सांगावे दिलेल्या वेळेपर्यंत जर रक्कम मिळाली नाही तर आम्ही रायगडावरून उतरणार नाही असा इशाराही संभाजीराजे यांनी सरकारला दिला. मला राजकारण करायचे नाही मी एक शिवभक्त आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे हे माझ्या आयुष्यातील स्वप्न आहे. यासाठी माझ्यासह शिवभक्त आक्रमकपणे प्रयत्न करतील. दिल्लीत शिवराज्याभिषेक सोहळा करून आम्ही हा महोत्सव देशपातळीवर नेला. पुढील टप्प्यात हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल. या सोहळ्यात बाहेरील देशाचे राजदूत सहभागी होतील. यासाठी मी आतापासूनच प्रयत्न करणार असल्याचे संभाजी राजे यांनी यावेळी सांगितले. शासन प्रत्येक मतदार संघात लाखो करोडो रुपयांची विकास कामेसाठी निधी मंजूर करत आहे. मात्र गडकिल्या दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. संभाजीराजे यांनी गेल्या काही वर्षापासून हा महोत्सव सर्वदूर त्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. येथून पुढील काळात या महोत्सवाची व्याप्ती वाढवणार असल्याचेही सांगितले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळुंखे सुखदेव गिरी माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत उपाध्यक्ष अतुल चव्हाण प्रशांत दरेकर संजय पवार विनायक फाळके यशवंत गोसावी सचिव अमर पाटील हे समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी आमदार रोहित पवार, मनोज जरांगे पाटील, अनिकेत तटकरे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदीमहाराष्ट्रातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर आणि लाखो शिवभक्त उपस्थित होते उपस्थित होते.