जातीपातीचे राजकारण रोखण्यासाठी शाहू छत्रपती महाराज रिंगणात : संभाजीराजे छत्रपती
( गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव – कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार दौरा)
गडहिंग्लज :
देशातील, राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. देशात दडपशाहीचा कारभार सुरु आहे. संविधान धोक्यात आहे. जातीपातीचे राजकारण केले जात आहे. कालपरवापर्यंत शिव – शाहूंचे समतेचे व पुरोगामी विचार सांगणारे आता ईडीच्या भीतीपोटी सोईनुसार वेगळ्या बाजूला गेलेत . मात्र समाजाला आज खऱ्या अर्थाने शिव – शाहुंच्या समतेच्या विचारांची गरज आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून
जातीपातीचे राजकारण रोखण्यासाठी शाहू छत्रपती महाराज रिंगणात उतरले आहेत, त्यांना विजयी करा, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
महाविकास व इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती यांनी गडहिंग्लज तालुक्यातील
कडगाव – कौलगे विभागातील वडरगे, लिंगनुर, क॥ नूल, बेकनाळ, कडगाव, जखेवाडी, शिप्पूर, करंबळी, हिरलगे, कौलगे, ऐनापूर, इंचनाळ, बेळगुंदी,गिजवणे,अत्याळ गावचा दौरा केला.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, संसदेत देशाचे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत बोलावे लागते, आपले म्हणणे पटवून द्यावे लागते, पाठपुरावा करावा लागतो. मात्र तसे होताना दिसत नसल्याने केंद्रातून ज्या गोष्टी आणायला पाहिजेत त्यात कोल्हापूर मागे पडत आहे. रोजगारनिर्मितीदृष्टीने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू छत्रपती महाराजांना विजयी करण्याचे आवाहन केले.
शिवसेना (ठाकरे गटाचे) तालुकाप्रमुख दिलीप माने म्हणाले, जीवाचे रान करून ज्या मंडलिकांना आम्ही निवडून आणले ते पाच वर्षात भागात फिरकले नाहीत, उठावदार काम नाही. ज्यांना हिंदी, इंग्रजी येत नाही ते संसदेत काय बोलणार. चूक पुन्हा करायची नाही. या गद्दाराना त्यांची जागा दाखवूया.
यावेळी राष्ट्रवादी पवार गटाचे अमर चव्हाण, रामराज कुपेकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख दिलीप माने, काँग्रेसचे सोमगोंडा आरबोळे, दिग्विजय कुराडे, ‘स्वराज्य’चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विकास पाटील, सूरज माने यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.