माजी अध्यक्षाना जेवढ्या ठेवी जमा करता आल्या नाहीत, तेवढा नफा आम्ही बँकेचा वाढविला : एकनाथ पाटील ( विरोधकांकडे चेहराच नसल्याची केली टीका )
कोल्हापूर :
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून
आमच्यावर खोटेनाटे आरोप करणारे विरोधी पॅनेलचे माजी अध्यक्ष महिना महिना बँकेतच येत नव्हते. त्यांच्या निष्क्रियतेमुळे कर्जाची थकबाकी वाढली होती, ठेवी वाढत नव्हत्या. आम्ही सत्तेत आल्यावर पूर्णपणे व्यवसायिक दृष्टीकोण ठेवून सभासदहिताला प्राधान्य देत ठेवी १६० कोटी तर नफा ५ कोटींवर पोहोचवला. गेल्या ४३ वर्षांत जे झाले नाही ते ७ वर्षात करून दाखवले. विरोधी गटाचे नेतृत्व करणाऱ्या माजी अध्यक्षाना जेवढ्या ठेवी जमा करता आल्या नाहीत, तेवढा नफा आम्ही बँकेचा वाढविला असल्याचा अभिमान असल्याचे सांगत एकनाथ पाटील यांनी विरोधकांकडे चेहराच नसल्याची टीका केली.
खुपीरे येथील संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभेत कपबशीला प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष एकनाथ पाटील पुढे म्हणाले,
गेली 43 वर्षाचा कारभार आणि आमच्याकडे सात वर्षे असलेल्या सत्तेत झालेल्या बँकेच्या प्रगतीचे पुस्तक सभासदांच्या हातात आहे. विरोधक एकदाही ताळेबंदावर बोलले नाहीत. बँकेच्या कारभारावर विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्याची उत्तरे प्रचार सभेत दिल्याने विरोधक तोंडावर पडत आहेत. आता सभासदच म्हणत आहेत, चांगल्या कारभाराविरुद्ध चांडाळचौकडी एकत्र आली आहे अशी टीका बँकेचे अध्यक्ष व सत्तारूढ आघाडीचे नेते एकनाथ पाटील यांनी केली.
डिझेल व फर्निचर खर्चावरील आरोपावर बोलताना अध्यक्ष पाटील यांनी बँकेच्या नवीन शाखासाठी बिद्री ५ लाख ९० हजार, शिरोली ९ लाख व व परिते ७ लाख ५५ हजार असा २२ लाख ४० हजार खर्च आला आहे. बँकेच्या गाडीचा डिझेल खर्च ६७ लाख नाही तर १२ लाख असल्याचे सांगत जर या व्यतिरिक्त जादा खर्चाची व्हाउचर विरोधकांनी दिली तर पॅनेलचा प्रचार थांबवतो, असेही अध्यक्ष पाटील यांनी छातीठोकपणे यावेळी सांगत विरोधकांकडे बोलायला मुद्दाच नसल्याचा टोला लागवला.