साचलेल्या तळ्यावर डोळा ठेवून लुटायला बसलेल्या टोळीचा नायनाट करूया : दादूमामा कामिरे यांची खुपीरे येथील सभेत विरोधकांवर सडकून टीका
कोल्हापूर :
एकनाथ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कष्ट घेऊन ठेवींच्या रुपात बँकेचे तळं भरले आहे. आणि या साचलेल्या तळ्यावर डोळा ठेवून हे तळे लुटायला एक टोळी तयार झाली आहे. या टोळीचा नायनाट करूया, अशा शब्दात ज्येष्ठ शेतकरी नेते दादूमामा कामिरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच बँक या टोळीपासून वाचविण्यासाठी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनललाच विजयी करण्याचे आवाहन केले.
खुपीरे ता. करवीर येथील संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते. सभेचे अध्यक्ष आणि माजी सरपंच आनंदा कृष्णा पाटील हे होते. यावेळी दादूमामा कामिरे पुढे म्हणाले, स्वतःच्या घराचा विचार न करता अहोरात्र बँकेचे काम करणारा जिल्ह्यात कोण चेअरमन आहे दाखवा. अशा प्रामाणिक काम करणाऱ्या चेअरमनवर आरोप करता, याच्यासारखे पाप कुठे फेडणार.
तुम्हीही पाच वर्षे चेअरमन होता, तुम्ही काय काम केले हे हिंदुराव तोडकर यांनी सांगितले आहेच, शिवाय तुमच्या कारभार सगळ्यांना माहित आहेच. अशा ठेवी मोडून खाल्ल्या तर बँक राहील का? तुमच्यावर कोण विश्वास ठेवल काय? असा प्रश्न केला.
एकनाथ पाटील यांच्यावर विश्वास आहे म्हणून १६० कोटीवर ठेवी गेल्या. यामागे कष्ट आहेत. नोकरी, कर्जे यामुळे सभासदांच्याच पोरांचे संसार उभे राहिलेत. नको ते आरोप करून सभासदाच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम करता काय? गेली ४०वर्षे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. आम्हाला कशाची हाव नाहीये. सभासदांचे हित जोपासणाऱ्या एकनाथ पाटील यांच्याच पाठीशी सभासद राहतील असा ठाम विश्वास आहे आणि कपबशीचाच विजय होणार हे नक्की आहे.