अखेर ऊस दराचा निर्णय झाला : राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या पदरात टाकलेच
कोल्हापूर :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दरवाढीसाठी आज गुरुवारी (२३ नोव्हेंबर) पुणे-बेंगळूरु या राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन सुरू होते. दरम्यान शेतकरी संघटना – कारखानदार – सरकार यांच्यात दरासंदर्भात चर्चा सुरूच होती. अखेर ऊस दराचा निर्णय झाला. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपयेएफआरपी दिली आहे त्यांनी टनास किमान ५० रुपये तर तीन हजार रुपयापेक्षा कमी एफआरपी दिली आहे त्यांनी टनास किमान १०० रुपये देण्याचा असा निर्णय झाला आहे. या लढ्यातून शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या पदरात टाकलेच. त्यामुळे शेतकरी राजू शेट्टी यांचे मनापासून अभिनंदन करत आहेत.
गेली दोन महिने झाले राजू शेट्टी मागील हंगामातील उसाचे ज्यादाचे पैसे मिळालेपाहिजेत यासाठी जिल्हाभर रान उठवले होते. ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलने करण्यात आली होती. तरीही कारखानदार जुमानत नसलेने त्यांनी आज गुरुवारी पुणे-बेंगळूरु या राष्ट्रीय महामार्गावरच रोखून धरला. निर्णय होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचा गर्भित इशारा दिला. सकाळपासून मोठ्या संख्येने शेतकरी संघटित होऊ लागल्याने शेट्टी यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
अखेर शेतकरी संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यात झालेल्या तोडग्यात मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपयेएफआरपी दिली आहे त्यांनी टनास किमान ५० रुपये तर तीन हजार रुपयापेक्षा कमी एफआरपी दिली आहे त्यांनी टनास किमान १०० रुपये देण्याचा निर्णयावर एकमत झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. शेट्टी यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे देण्याचे कार्य त्यांच्या लढ्यातून झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा गाळप हंगाम धडाक्यात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.