सांगरूळ ग्रामपंचायत चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना : लोकवर्गणी व ग्रामपंचायतच्या माध्यमातून उभारणी, जलाभिषेक घालून विधिवत पूजन
करवीर :
सांगरुळ (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या वतीने व लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामपंचायत चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आला. छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.
सांगरुळ ग्रामपंचायत मुख्य चौकात पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा चबुतरावरील अर्ध पुतळा होता .कालांतराने हा पुतळा खराब झाल्याने या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती . ग्रामपंचायत व लोक वर्गणी या माध्यमातून सध्याच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रॉझ धातूपासून बनवलेला शिवरायांचा नवीन अश्वारूढ पुतळा बसविण्याचा निर्णय घेऊन तो पूर्णत्वास नेला .ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून जलाभिषेक करण्यात आला .
सुरुवातीस संदिप स्वामी व सौरव स्वामी यांनी मंत्र पठण केले. संदीप जंगम, स्मिता जंगम यांच्या हस्ते विधिवत पूजा केली . यानंतर गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व गावातील सर्व तरुण मंडळांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते शिव पुतळ्यास भगवा शेला व कमरपट्टा घालून जलाभिषेक करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी शिव पुतळ्यास जलाभिषेक घालून वंदन केले .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजच्या पिढीला चांगले आचार , विचार आणि चांगल्या संस्काराची प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे, करवीरच्या माजी सभापती सीमा चाबूक, सरपंच शितल खाडे, उपसरपंच उज्वला लोंढे, यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गावातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी व संचालक तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते .