प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा : राजू शेट्टींचा कारखान्यांना ०२ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टीमेटम : गत हंगामात तुटलेल्या उसाचे ४०० रुपयेची मागणी
कोल्हापूर :
कोल्हापूर व सांगली जिल्यातील साखर कारखान्यानी गत हंगामातील तुटलेल्या उसाचे ४०० रुपये द्यावे.
०२ ऑक्टोबरपर्यंत कारखान्यानी ही रक्कम नाही दिली तर कारखान्यांची साखर वाहतूक अडवणार तसेच प्रत्येक कारखान्यासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यांनी गत हंगामातील उसाला ४०० रुपये मिळावेत, कारखान्यानी ऑनलाइन वजन काटे बसवावेत अन्यथा त्यांना गाळप परवाने देऊ नयेत या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेट्टी बोलत होते.
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, साखर, इथेनॉल व उपपदार्थास चांगले दर मागील हंगामात चांगले दर मिळाले आहेत.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हारी पुणे जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा जास्त आहे. सोमेश्वर माळेगांव (पुणे )साखर कारखान्याने प्रतिटन ५०० रूपयाहून अधिकचा दुसरा हफ्ता दिला आहे. यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दुसरा हा प्रतिटन ४०० रुपये देणे शक्य आहे.
चांगला उत्पन्न मिळत असूनही कारखाने शेतकऱ्यांना जास्त दर देत नाहीत. आज महागाईने उस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सरकारच्या धोरणाबरोबर कारखान्याकडून ही लूट सुरू आहे.त्यामुळे आम्ही कारखान्यांना हा दर दिल्याशिवाय सोडणार नाही. यापुढे आंदोलने सुरूच राहतील. धडक मोर्चाची दखल घेऊन मागण्याबाबत लवकर कार्यवाही करावी अन्यथा राज्यभर आंदोलन उसळेल असा इशारा दिला.
या धडक मोर्चात स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील, सावकार मादनाईक आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील,अजित पोवार, राजेंद्र गड्यानवार यांचेसह संघटनेचे पदाधिकारी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकरी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने
विराट मोर्चात सहभागी झाले होते.