सेवानिवृत्त सैनिक अजित निकम यांचे सावर्डे दुमाला येथे वाजतगाजत मिरवणुकीने स्वागत
करवीर :
करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला गावचे सुपुत्र सैनिक अजित सखाराम निकम यांनी २२ वर्षे देशसेवा केली. २२ वर्षानी ते हवालदार पदावरून ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने गावाच्या स्वागत कमानीपासून ते संपूर्ण गावातून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण केले.
मिरवणुकीनंतर श्री विठ्ठल मंदिरात आयोजित सभेत ग्रामपंचायत, विविध संस्था, तरुण मंडळे, मित्रपरिवार, नातेवाईक यांनी बुके देऊन निकम यांनी २२ वर्षे देशसेवा बजाविल्याबद्दल त्यांच्या कार्याचा सन्मान केला. तसेच त्यांना पुढील आरोग्य उत्तम, आरोग्यसंपन्न जावो, तसेच गावच्या सामाजिक कार्यात पुढाकार राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी अजित निकम म्हणाले,सेवानिवृत्तीनिमित्ताने गावाने इतक्या दिमाख्यात मोठ्या आत्मीयतेने माझे केलेले स्वागत व दिलेल्या शुभेच्छा यांनी मी भारावून गेलो आहे. हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही. देशाची सेवा करण्याची संधी मिळाली याचे समाधान आहे. यापुढे गावातील विविध सामाजिक कार्यास सहकार्य राहील असे सांगितले.
बलशाली भारत युवा संघटनेच्या आयोजनातून पार पडलेल्या सेवानिवृत्तीपर स्वागत व शुभेच्छा कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश कारंडे सर, शाळा समितीचे अध्यक्ष युवराज पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत , विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, युवक, मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते. आभार धनाजी निकम यांनी मानले.