बालिंगा, जिल्हा परिषद कॉलनीत
पंधरा लाखांचे दागिने आणि रोकड चोरीला
नागरिकांच्यात भीतीचे वातावरण
कोल्हापूर :
करवीर तालुक्यासह उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या बंगल्यांना अज्ञात चोरट्यान लक्ष केले. २४ तासात चोरट्यानी करवीर तालुक्यातील बालिंगा, जिल्हा परिषद कॉलनीतील ३ बंगले फोडले.यामध्ये सुमारे १५ लाखांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद कॉलनीत राहणाऱ्या अक्षय जिरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान चौथ्या चोरीच्या घटनेत कुडित्रे येथे पाणीपुरवठा संस्थेची केबल चोरट्याने चोरल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिल्या चोरीत,
११ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास……
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द परिसरात असलेल्या जिल्हा परिषद कॉलनीत अक्षय जिरंगे हे कुटुंबीयांसह राहतात. ३० तारखेला ते कुटुंबीयांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे पर्यटनासाठी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी या बंगल्याला लक्ष केले. बंगल्याचा कडी कोंडा उचकटून चोरट्यानी घरात प्रवेश केला. बंगल्यातील तिजोऱ्या फोडून त्यातील १० तोळ्याच्या बिलवर पाटल्या, अडीच तोळ्याचा राणीहार, ३ तोळ्याचा लक्ष्मी हार आणि सोन्याचा सर, २ तोळे वजनाचा रवी माठाचा हार आणि चेन, ८ अंगठ्या, बाल अंगठ्या, दीड तोळ्याचे झुबे, ७ जोड सोन्याचे टॉप्स असं ११ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शेजाऱ्यांनी जिरंगे यांना फोन करून या चोरीबाबत माहिती दिल्यानंतर ते गावाहून परत आले. चोरीबाबत माहिती घेवून त्यानी करवीर पोलिसात तक्रार दिली आहे.
दुसऱ्या चोरीच्या घटनेत,सोन्या – चांदीचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये लांबविले……
त्याच मध्यरात्री चोरट्यांनी कोल्हापूर – गगनबावडा रोडवरील बालिंग्या नजीकच्या बंडोपंत दळवी कॉलनीतील काही बंगल्यांना लक्ष केले.विमा एजंट म्हणून कार्यरत असणारे सोपान गायकवाड हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील कोतोली माळवाडी इथले रहिवासी आहेत. गेल्या वर्षी त्यांनी बंडोपन दळवी कॉलनीत बंगला बांधला आहे, ३० तारखेला ते कुटुंबियांसह गावी गेले होते. सायंकाळी ते कोल्हापूरकडे परत असताना एक वटवाघुळ त्यांच्या चेहऱ्याला धडकलं त्यामुळे डोळ्याला इजा झाल्याने ते पुन्हा गावी गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने दळवी यांचा बंगला फोडला व चोरी केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी फोन करून त्यांना घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर ते घरी आले. दुसऱ्या मजल्यावरील तिजोरी फोडून त्यातील सोन्या – चांदीचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये चोरल्याबाबत त्यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली आहे.
तिसऱ्या चोरीच्या घटनेत,चोरट्यांच्या हाती दाग दागिने लागले नाहीत पण रोख १० हजार रुपये चोरले……
त्यांच्याच बाजूला राहणारे निखिल सुतार हे अग्निशामक दलात फायरमन म्हणून काम करतात. त्यांचे उमा टॉकीज जवळ जूने घर आहे. दोन दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांसमवेत जुन्या घराकड राहायला गेले होते. यादरम्यानच्या कालावधीत चोरट्यानी त्यांच्या बंगल्याचा कडी – कोयंडा उचकटून बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावरचे लाकडी कपाट फोडले आहे. सुदैवानं चोरट्यांच्या हाती दाग दागिने लागले नाहीत. पण रोख १० हजार रुपये चोरट्यानी चोरून नेले. याप्रकरणी करवीर पोलिसात नोंद झाली आहे.
तालुक्यातील चौथ्या चोरीच्या घटनेत,
कुडित्रे येथे पाणीपुरवठा केबल चोरीला…….
कुडित्रे येथे श्रीराम पाणीपुरवठा संस्थेची सुमारे ६० फूट केबल चोरीला गेली, यापूर्वी इतर साहित्यही चोरीला गेले आहे. याबाबत अध्यक्ष बाळासाहेब आडनाइक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. केबल चोरीला गेल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपनगर व ग्रामीण भागात करवीर तालुक्यात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे नागरिकांच्या भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढ़वावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.