हर्षवर्धन सदगीरचा, बाला रफिक शेखवर विजय :
सांगरूळ कुस्ती मैदान
करवीर :
येथील जोतिर्लिंग यात्रा कमिटी व खाडे तालीम मंडळ यांच्या वतीने झालेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या प्रेक्षणीय लढतीत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांने महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याचे वर झोळी डावावर विजय मिळवला. १९ मिनिटे कुस्तीचा थरार सुरू होता.
हर्षवर्धनला दोन लाख इनामासह भैय्या केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले.प्रथम क्रमांकाच्या लढतीला हिंदकेसरी दीनानाथसिंह, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे ,महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, पै संभाजी पाटील, बाजीराव खाडे यांचे सह ग्रामपंचायत व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

कुस्तीच्या सातव्या मिनिटालाच दस्ती खेचत बाला रफिक शेखने सदगीरवर ताबा मिळविला. बाला रफिक एक चाक डावाची पकड घेत असतानाच सदगीरने यातून सुटका करून घेतली. पुन्हा खडाखडीने कुस्ती सुरू असताना एकेरी पट काढत सदगीरने बाला रफीक शेखवर ताबा घेतला. त्यातच गदालोट मारण्याचा बालाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. कुस्तीच्या १९ व्या मिनिटाला झोळी डावावर हर्षवर्धन सदगीरने बाला रफिक शेखवर प्रेक्षणीय विजय मिळवला.
प्रथम क्रमांकासाठी दीड लाख इनाम देण्यात आला, सांगरुळ केसरी किताबासाठीची दुसरी लढत उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप व उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात झाली. कुस्तीच्या तिसऱ्या मिनिटाला दस्ती खेचत गणेशने अक्षयचा ताबा घेतला पुढच्याच मिनिटाला अक्षयने ही तितक्या चपळाईने सुटका करून घेतली. खडाखडीने कुस्ती सुरू असताना कुस्ती कडेला जाऊन दोन्ही पैलवान आखाड्याच्या बाहेर पडले. यात दोघेही जखमी झाल्याने ही प्रेक्षणीय कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
सेनादलचा अभिजीत कसोटे यांने पै सचिन पाटील याचेवर एकलंगी डावावर विजय मिळविला. अन्य प्रेक्षणीय लढतीत हृदयनाथ पाचाकटे,राजवर्धन पाटील, सागर पाटील , अमोल कोंडेकर, विश्वजीत पाटील ,नवनाथ गोटम, अनुज तोडकर ,महेश हराळे, बबलू पाटील, गणेश शिदे यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत विजय मिळवले. स्थानिक मल्ल केदार खाडे, साई सुतार, अनुज घुंगुरकर, शुभम खाडे, धैर्यशील लोंढे, आमर खाडे यांनी प्रेक्षणीय विजय मिळवलेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. जयंत आसगावकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे,बी एच पाटील, हिंदुराव तोडकर, पै. संभाजीराव पाटील, सुभाष पाटील, पै. रंगराव कळंत्रे , उत्तम पाटील, शिवाजीराव खाडे, कृष्णात चाबूक,भरत खाडे, उपस्थित होते.