सावर्डे दुमाला येथे घरफाळा, पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची घरोघरी भेटी : वसुलीस सहकार्य करण्याचे सरपंच भगवान रोटे यांचे आवाहन
करवीर :
गावातील घरफाळा, पाणीपट्टी थकीत राहिल्यामुळे ग्रामपंचायतीस पायाभूत सुविधांच्या कामाना गती मिळेना तसेच महावितरणकडून पाण्याचे थकीत वीज बिल भरण्यासाठीचा तगदा सुरू असल्याने सावर्डे दुमाला (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामसेवक, कर्मचारी यांनी एकत्रितरित्या वसुलीसाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेत वसुलीला प्राधान्य दिले. यामुळे एकाच दिवशी सुमारे ३५ हजार रुपयांची वसुली झाली.
प्रसंगी सरपंच भगवान रोटे यांनी, घरफाळा, पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायत कसोशीने प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त निधी आणून गावातील विकासकामे करण्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही. मात्र ग्रामस्थांनी घरफाळा, पाणीपट्टी कर वेळच्या वेळी भरावा तसेच सध्या थकीत कर वसुलीच्या मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन केले.
वसुली मोहिमेत उपसरपंच प्रकाश कदम, ग्रामसेवक पांडुरंग बीडकर, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य हिंदुराव भोसले, तुषार निकम, दिगंबर कारंडे तसेच सरदार भोसले, गणेश भोसले, रघुनाथ खाडे, रघुनाथ सुतार, एकनाथ कांबळे व कर्मचारी सहभागी झाले होते.