वणव्यात सातेरी महादेव डोंगरावरील हजारो झाडे जळाली
कोल्हापूर :

करवीर तालुक्यातील धार्मिक व पर्यटन क्षेत्र असलेल्या सातेरी महादेव डोंगर परिसरात पाच सहा दिवसापूर्वी लागलेल्या वणव्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने हरित टेकडी योजनेतून लावण्यात आलेली हजारों झाडे जळाली आहेत. झाडांची व पर्यावरणाची झालेली हानी पाहून पर्यावरण प्रेमींकडून तीव्र निषेध केला
जात आहे. तसेच अशी गैरकृत्ये करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सन २०१६ – १७ सालात जेसीबी, पोकलँडच्या सहायाने खड्डे मारून विविध जातींच्या सुमारे १० हजार रोपांची शास्रोक्त पद्धतीने लागवड करण्यात आली होती. धोंडेवाडी ते सातेरी रस्त्याच्या दुतर्फाही अंदाजे हजार झाडे लावली गेली होती. वृक्षारोपण चळवळीत भागातील शाळा महाविद्यालयातील मुलांमुलींचा, विविध सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमिंचा विशेष सहभाग होता. डोंगरावरील पाण्याची दुर्भीक्षता पाहता सर्वांच्या प्रयत्नातून जवळपास निम्मी अधिक झाडे चांगल्या पद्धतीने जगविण्यात यश आले होते.ही झाडे जगविण्यासाठी हजारों हात झटले होते.
मात्र मागील पाच सहा दिवसांपूर्वी डोंगरावर लावलेल्या आगीमुळे झाडाचे न भरणारे नुकसान झाले आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने व लोकसहभातून वृक्षारोपण केले. जतन केले. झाडे जागविण्यासाठी लोकसहभागातून सर्वांनी अपार कष्ट घेतले होते. मात्र वणव्यामुळे जगविलेली हजारो झाडे बेचिराग पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. वणवा
पेटवू नये यासाठी जनजागृती केली पाहिजे. यापुढे झाडाना जीवदान कसे देता येईल यासाठी पयत्न करू.
—– राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती, करवीर पं.स.