वर्षाला १४, १९, २६ व २६ कोटी असा तोटा वाढतच गेला, दरवर्षी तोटा वाढविणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा : कॅप्टन उत्तम पाटील
कोल्हापूर :
कुंभी कारखान्यावर ३०० कोटींचा कर्जाचा डोंगर आहे. हे कर्ज कमी करून कारखान्याचा तोटा कमी करणे आवश्यक होते. मात्र व्हीएसआयच्या रिपोर्टनुसार सन १७-१८ ते २०-२१ सालात अनुक्रमे१४, १९, २६ व २६ कोटी असा तोटा वाढतच गेल्याचे स्पष्ट होते. याप्रमाणात तोटा वाढत गेला तर २ वर्षानंतर कारखाना सभासद मालकीचा राहणारच नाही. सत्ताधाऱ्यांची लबाडी आणखी किती उघडी पडणार, असा टोला लगावत दरवर्षी तोटा वाढविणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन उत्तम पाटील शिंगणापूरकर यांनी केले.
खुपिरे येथील राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या सभेच्या अध्यक्षस्थानी रणजित पाटील होते. यावेळी प्रकाश देसाई म्हणाले, १७ वर्षे सत्ता तुमच्या हातात, गैरकारभार तुमचा आणि आरोप आमच्यावर करता. अध्यक्ष नरके यांना काय बोलतोय हेच कळेना झालेय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
बबन रानगे म्हणाले, सत्ताधारी नरकेंनी धनगर समाजाला कारखान्यात कधीही उमेदवाऱी दिली नाही. यांना धनगर समाजाला न्याय द्यायचा नाही. पण शाहू आघाडीने आम्हाला उमेदवाऱी देऊन सन्मान केला आहे. सर्व धनगर समाज कपबशीलाच निवडून देऊन नरके पॅनेलला जागा दाखवेल.
यावेळी चेतन नरके, बाळासाहेब खाडे, प्रकाश देसाई, एकनाथ पाटील, शंकरराव पाटील,प्रकाश मुगडे, शिवाजी पाटील, सरपंच दीपाली जाभळे, तेजस्विनी पाटील, आकाराम पाटील, बबलू पाटील, दादू कामिरे, बाजीराव देवाळकर आदिनी सत्ताधाऱ्यांवर टिकेचा भाडीमार केला. हिंदुराव पाटील, सर्जेराव हुजरे, सुभाष निकम, एस.डी.पाटील, पी बी पाटील, राजेंद्र पाटील, सभासद उपस्थित होते.