डी.सीं.चे विचार बाजूला ठेऊन कारखाना राजकीय अड्डा बनविला : चेतन नरके
वाकरे येथील सभेत कुंभीच्या कारभारावर टीकास्त्र, परिवर्तनाची हाक
कोल्हापूर :
पी.एन. पाटील – अरुण नरके यांची मैत्री सोन्यासारखी आहे. शब्दाला जागणारी व्यक्ती म्हणून अरुण नरके यांची ओळख आहे. त्यामुळे शऱीराने एके ठिकाणी मनाने एके ठिकाणी असे असू शकत नाही. कुंभी कारखान्यात डी.सीं.चे विचार विचार बाजूला ठेऊन राजकारण आणले. कारखाना राजकीय अड्डा बनविला असा आरोप करत कारखाना वाचावा म्हणून योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यात बदल नाही. राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलच्या पाठीशी ठाम आहे, असा विश्वास गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिला.
वाकरे येथे राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलची जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी पै. अशोक माने होते. यावेळी कोपार्डे येथील बाजीराव दत्तू पाटील यांनी पाठींबा दिल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी चेतन नरके म्हणाले, अरुण नरकेंनी पुतण्यासाठी मुलाचे राजकीय जीवन संपवले.
डी.सीं.नी फक्त कारखाना व शेतकऱ्यांचा ध्यास घेतला होता. सहकारात राजकारण कधीच आणलं नव्हते. पण यांनी कारखाना राजकीय अड्डा केला. स्वतः राजकारणासाठी कारखान्याचा बळी दिला. ज्यांच्या अहवालच खोटा आहे तो पारदर्शक कसला. कारखान्याचे शासकीय ऑडिट केले पाहिजे. राजकारणासाठी नव्हे तर डी.सीं.च्या विचाराला पुसले जाऊ नये म्हणून अरुण नरके, संदीप व मी राजर्षी शाहू पॅनेलच्या पाठींब्याला बांधील आहे. लागेल तेथे उभा आहे.
राऊसो पाटील म्हणाले, गेली दोन तीन दिवस आम.सतेज पाटील यांनी नरके पॅनेलला पाठींबा दिल्याच्या खोट्या अफ़वा पसरविल्या जात आहेत. त्यांनी असा कोणताही पाठींबा किंवा कार्यकर्त्यांना संदेश दिलेला नाही. त्यांचा पाठींबा राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेललाच आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. आमच्या घराण्यानेही एकदा शब्द दिला म्हणजे तो कायम असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
यावेळी बाळासाहेब खाडे, एकनाथ पाटील, दादू कामिरे, बाजीराव खाडे, प्रकाश देसाई, राजेंद्र सूर्यवंशी, रसिका पाटील, उत्तम पाटील, सूरज पाटील यांची भाषणे झाली.प्रा.वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. भगवान पाटील, जयसिंग पाटील, संभाजी पाटील, आर.डी.पाटील, विठ्ठल तोरस्कर, हिंदुराव तोडकर, विजय पोवार, सागर सूर्यवंशी यांच्यासह सभासद उपस्थित होते.