सभासदांना हातात खुरपं घ्यायची वेळ कुणी आणली? : राजेंद्र सूर्यवंशी ( शिरोली दुमाला येथे राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलची जाहीर सभा)
कोल्हापूर :
आजही या भागातील शेतकऱ्यांच्या आडसाली उसाला तोडी मिळाल्या नाहीत. अनेक ज्येष्ठ शेतकरी, सभासद वयामुळे त्यांचे गुडघे घाईला आले तरीही केवळ आपला ऊस जावावा म्हणून हातात खुरपे घेऊन सरीत बसून ऊस तोडताना पाहताना वाईट वाटते, मन सुन्न होते. जर तोडणी ओढणीची बिले वेळेत दिली असती, पाळीपत्रक नियोजनबद्ध असते तर टोळ्या वाढल्या असत्या आणि आमच्या गोरगरीब सभासदांवर खुरपं हातात घ्यायची वेळ आली नसती. ही वेळ कुणी आणली? हे सुज्ञ सभासद जाणतात. त्यामुळे ते कपबशीलाच पॅनेल टू पॅनेल मतदान करा, असे आवाहन राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
शिरोली दुमाला (ता.करवीर) येथील राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलची जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी बाजीराव पाटील होते.
बाजीराव खाडे म्हणाले, अध्यक्ष नरके हे धूर्त राजकारणी आहेत. ह्यांचा खर्च भागेना म्हणून १५ वर्षात कारखान्यावर कर्ज वाढले. ज्या अरुण नरकेंनी यांना आमदार केले, अध्यक्ष केले त्यांचा हे विश्वास प्राप्त करू शकले नाहीत, ते तुमचा आमचा विश्वास काय प्राप्त करणार. त्यामुळे कारखान्यातील लूट थांबविण्यासाठी ही राजकीय नव्हे तर सभासदांच्या अस्तित्वाची लढाई आहे.
स्नेहल उत्तम पाटील शिंगणापूर म्हणाल्या, आज सर्वच शेतकऱ्यांना स्वतः ऊस तोड करावी लागत आहे, हे चिंताजनक आहे. त्यामुळेच आता परिवर्तनाचा वणवा पेटला आहे. कपबशीचे वारे जोरात आहे.
बाळासाहेब खाडे म्हणाले, ज्यांना कारखान्यावरील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर कारंजा होता, तो सुरू ठेवता आला नाही त्यांनी मोठ्या गप्पा मारू नयेत. आम.पी.एन. पाटील, आम. विनय कोरे, अरुण नरके यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे विजय निश्चित आहे.
स्वागत सरदार पाटील यांनी केले. यावेळी ऍड. प्रकाश देसाई, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, प्रा. वसंत पाटील, उत्तम पाटील, बुद्धीराज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेचा भडीमार केला. सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.