तुमची पारदर्शकता १५ वर्षात उघडी पडली : एकनाथ पाटील ( कोपार्डे येथील राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांवर टीका)
कोल्हापूर :
कारखान्यावर झालेला कर्जाचा डोंगर, कामगारांचे थकलेले पगार, पाळीपत्रकाचा बट्याबोळ, नरके शाळेतून वर्षाला २ कोटीचा स्वनफा , निवडणुका तोंडावर आल्याचे पाहून लांबलेली बिले देण्याची सोंगे , स्वतः च्या नफ्यासाठी उभा केलेला चुकीचा को जन प्रकल्प, नियोजनशून्य कारभार अशा अनेक गोष्टी पाहता तुमची पारदर्शकता सभासदांसमोर कधीच उघडी पाडली असल्याची टीका यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केली. कोपार्डे (ता.करवीर) येथील राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा पाटील होत्या.
यावेळी बाळासाहेब खाडे म्हणाले,कारखान्यावरील कर्जे कमी करत आहे म्हणता, मग गेल्या वर्षी २ कोटी ७४ लाख आणि यावर्षी ४कोटी ४६ लाख रुपये कर्जाचे व्याज कसे वाढत गेले. कर्ज कमी होत असेल तर हे कर्जावरील व्याजही कमी व्हायला हवे. सत्ताधारी खोटे अहवाल देण्याबरोबरच रेटून खोटे बोलत आहेत. २०० कोटी कर्ज फेडले असेल तर आमचे पॅनेल माघार घेतो तसेच मीही गोकुळ संचालक पदाचा राजीनामा देतो, यावर तुम्ही काय करणार ते सांगा, असा सवाल उपस्थित केला.
ऍड प्रकाश देसाई म्हणाले, आम. पी.एन.पाटील व विनय कोरे सावकर यांनी अध्यक्ष मुश्रीफ यांच्याकडे कुंभीला कर्ज देण्यास अनुमती दिली, त्यांना तुम्ही बाहेरचे नेते म्हणता. बिनविरोधसाठी वेळकाढूपणा तुम्हीच केला. तुमच्या गलथान व हुकूमशाही कारभाराला सभासदच थांबवतील. आम्ही एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांना काय सुचेनासे झाले आहे.
यावेळी प्रा.टी.एल.पाटील, बाजीराव खाडे, दादू कामिरे, राजेंद्र सूर्यवंशी यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर खरपूस टीकास्त्र सोडले.सभेला एस.के. पाटील, नामदेव पाटील, ए.डी. पाटील, सर्जेराव पाटील, बी.टी.पाटील, अमर पाटील, रणजित पाटील यांच्यासह सर्व उमेदवार, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.