ग्राऊंड रिपोर्ट
कोल्हापूर :
निवडणूक म्हटले की,प्रचार यंत्रणा, जाणे येणे आणि खर्चही आलाच. पण दररोज भाजी भाकरी बांधून राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे उमेदवार बाहेर पडतात. दुपारी एके ठिकाणी एकत्र बसून भाजी भाकरी सोडून खातात. प्रचारात जेवणावळीचा
डामडौल न करता घरची भाजी भाकरी खाऊन निवडणूक प्रचारातील एक साधेपणा पाहायला मिळाला.
सकाळी साडे सातच्या दरम्यान बाहेर पडण्यास सुरवात होते. झेंडे लावलेल्या गाड्यांचा ताफा गावात येतो.प्रचाराच्या सभा होतात, आणि पुढच्या गावाला हा ताफा निघून जातो.एक एक गाव करत असताना पुढच्या गावातील सभासदांना वेळेवर भेटण्यासाठी पुरती धावपळ सुरू असते. कोणी चहा घ्या म्हंटले तरी वेळ नसतो, अशीच धावपळ उडालेली असते.आणि वेळ येते दुपारी एकची..भूक लागलेली असते.
एकमेकांना फोन होतात आणि गाड्यांचा ताफा वळतो एखाद्या शेतात, डोंगरातील झाडाच्या शांत कुशीत किंवा एखाद्या सार्वजनिक मंदिरात. तेथे काही वेळचा विसावा घेतला जातो. डबे, कापडी पिशव्या आणि पंजाचे पांढरे कापड पाहिले की आठवण येते, शेतकऱ्यांच्या कष्टाची – शेतातल्या भाजी भाकरीची,आठवण येते जुन्या आई वडिलांच्या काळातील भाजी भाकरीची, आणि घरातील महिलांच्या आपुलकीची.
एकत्र बसून भाजी भाकरी चपाती,कांदा, दही यावर ताव मारला जातो. मात्र तरीही अशा वेळी गपा गपा डबा खावा लागतो. या जेवणाची चवच न्यारी असते, मात्र चवीनं खाण्यासाठी फार वेळ नसतो.लगेच पुढच्या गावातील कार्यकर्ते यांचे फोन वाजू लागतात आणि कसा बसा डबा गुंडाळून हा ताफा पुढच्या प्रवासाला निघतो. एकूणच राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचा प्रचारातील घरचा डबा भावत आहे. हाच घरचा डबा पुढच्या काळातही राहणार असा संदेश पॅनेलकडून मिळत आहे.