शालेय शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संवर्गातील पदे भरण्याबाबत नवीन नियम जाहीर
मुंबई :
शालेय शिक्षण, विभागातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी संवर्गातील पदे भरण्याबाबत नवीन नियम जाहीर करण्यात आले . शिक्षणाधिकारी संवर्गातील २० टक्के पदे नामनिर्देशाने, तर ८० टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे ५० टक्के सरळसेवेने व उर्वरित ५० टक्के पदे पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र शिक्षण सेवेतील शिक्षणाधिकारी गट अ ( प्रशासन शाखा) पदाचे सेवा प्रवेश नियम जाहीर केले आहेत. शिक्षणाधिकारी पदासाठी सांविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलली अन्य कोणतीही शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
शिक्षणाधिकारी व तत्सम पदांमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षण निरीक्षक (बृहन्मुंबई), साहाय्यक संचालक, साहाय्यक आयुक्त, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, साहाय्यक संचालक ( राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद), संचालक, प्रशासन अधिकारी, इत्यादी पदांचा समावेश आहे. तसेच प्रशासन अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी , महानगरापालिका शिक्षण मंडळ, प्रशिक्षण प्रमुख, समन्वयक, प्रकल्प समन्वयक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, वरिष्ठ प्रकल्प संचालक ( शिक्षण) सारथी, ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत.
शिक्षणाधिकारी संवर्गातील पदांपैकी २० टक्के पदे नामनिर्देशाने तर, ८० टक्के पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. त्यामुळे सध्या शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीद्वारे शिक्षणाधिकारी पदावर नियुक्तीची अधिकची संधी मिळणार आहे.राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी संवर्गातील पदांवरील नियुक्तीसंबंधीचे सेवाप्रवेश नियमही जाहीर केले आहेत. या पदासाठीही कोणत्याही शाखेचे पदवीधारक पात्र ठरणार आहेत. उपशिक्षणाधिकारी संवर्गातील ५० टक्के पदे नामिनिर्देशनाने भरण्यात येणार आहेत. तर, ३० टक्के पदे पदोन्नतीने आणि २० टक्के पदे विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने २८ डिसेंबर २०२२ रोजी दोन स्वतंत्र अधिसूचना काढून शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संवर्गातील अधिकारी पदांचे नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर केले आहेत.