Cow Conservation : गोमातेच्या शास्त्रीय संवर्धनाचा घेऊ वसा

Tim Global :

भारतात प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही विज्ञान आहे. आज वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त गाय-वासराची पूजा करण्याबरोबर गोविज्ञान पण जाणून घेऊया…

आज वसुबारस. सणांचा राजा दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने (Vasubaras) होत असते. प्राचीन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीत (Indian Culture) गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना, तिला आपण गोमातादेखील म्हणत असतो. या दिवशी आपण सर्व जण गाईची तिच्या वासरासह पूजा करतो. तिला ओवाळतो, अर्घ्य देतो, तिला नैवेद्य दाखवतो. परंतु भारतात प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही विज्ञान आहे. आपण फक्त एक दिवस गाईची पूजा करून भागणार नाही, तर वर्षाचे उर्वरित ३६४ दिवस तिची काळजी घेतली पाहिजे. गाय तिचे गोमय (शेण) व गोमूत्र जे भूमातेचे स्वाभाविक अन्न आहे. गोमय व गोमूत्र मुबलक मिळाले की आपली भूमाता आरोग्यवान होऊन भरपूर प्रमाणात पौष्टिक अन्नधान्याचे उत्पादन (Food production) देते. सोबत गाईच्या अमृततुल्य दुधामुळे समाज बलवान होतो. तसेच गाय शेतीच्या कामासाठी बैलसुद्धा देत असते.

परदेशातील लोक कदाचित गाईची पूजा करत नसतील, परंतु ते वर्षभर त्या गाईची वैज्ञानिकदृष्ट्या काळजी घेतात व भरपूर दूध उत्पादन मिळवतात. आपला देश दूध उत्पादनात आघाडीवर असला तरी प्रति जनावर दूध उत्पादनात इतर देशांच्या तुलनेत खूपच मागे आहे. गाईच्या पोटात तेहेतीस कोटी देव असतात असे आपली संस्कृती सांगते, वास्तविक तिच्या पोटात तेहेतीस कोटी प्रकारचे जिवाणू असतात, जे तिने खाल्लेल्या चाऱ्याचे व खाद्याचे पचन करून तिचे दुधात रूपांतर करतात. गाईची कास ही दूध तयार करण्याचे मशिन आहे. गाईला आपण कामधेनूदेखील म्हणतो. या अनुषंगाने देशी गोवंश संवर्धनासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रयत्न आपल्या देशात झाले पाहिजेत.

१) सेंद्रिय धान्य व सेंद्रिय भाजीपाल्याची बाजारात मागणी वाढल्याने शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळलेला आहे. सेंद्रिय शेती ही प्रामुख्याने पशुसंवर्धनावर आधारित असते. त्यामुळे पशुधन आधारित सेंद्रिय शेतीसाठी आणखी काही प्रोत्साहनपर कार्यक्रम घ्यायला हवेत.

२) गाईचे शेणखत, तसेच गोमूत्राचा शेतीतील वापराबरोबर मानवोपयोगी औषधासह इतर बाबींवर व्यापक संशोधन होणे गरजेचे आहे. जेणेकरून गोवंशपालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू शकेल.

३) देशी गाईंचे जतन व संवर्धन करण्यासाठी देशी सिद्ध वळूच्या रेतमात्रा त्या त्या भागात सहज उपलब्ध असाव्यात.

४) देशी गायीची दूध उत्पादन क्षमता तशी खूप कमी आहे. ती कशी वाढेल याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून देशी गोवंश पालनाकडे पशुपालक वळू शकतील.

५) पशुसंवर्धन खात्याने म्हणजेच शासनाने लिंगवर्धित कृत्रिम रेतमात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्याद्वारे ९० टक्के कालवडी जन्माला येऊ शकतात. त्या कमी दरामध्ये व सहज मिळू शकतील यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

६) ‘आयव्हीएफ’सारखे तंत्रज्ञान देखील आता उपलब्ध आहे. परंतु ते महागडे असल्याने सर्वसामान्य शेतकरी अजून याकडे वळलेले नाहीत. हे तंत्र माफक दरात कसे उपलब्ध होऊ शकेल हे पाहावे लागेल.

७) भारतात जवळपास ९८ टक्के दूध A2 आहे. त्यामुळे A1 आणि A2 दुधाबद्दल नेमक्या पद्धतीने जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

८) शासनाने गोहत्या बंदी कायदा आणला तो गोवंश संवर्धनाकडे टाकलेले पाऊल आहे. पण त्याचबरोबर अनुत्पादक पशूंची काळजी व दैनंदिन गरजा यासाठी गोशाळा व तत्सम यंत्रणा अधिक सक्षम झाल्या पाहिजेत.

९) पशुप्रजनन हा विषय व्यापक असल्याने गाईमध्ये दरवर्षी एक वासरू व म्हशींमध्ये सव्वा वर्षात रेडकू हे फक्त कृत्रिम रेतनाने साध्य होऊ शकते.

१०) जनावरांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी व दूध उत्पादनात सातत्य राहण्यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक लसीकरण १०० टक्के करून घेण्यासाठी पशुपालकांचे प्रबोधन केले गेले पाहिजे.

११) दूध व दुधाचे पदार्थ आरोग्यासाठी कसे हितकारक आहेत याबद्दल सतत जनजागृती हवी कारण लोक दूध व त्याचे पदार्थ घेण्याऐवजी कोल्ड ड्रिंक्स पिताना दिसतात, जे मानवास हानिकारक आहे याबद्दल नियमित जनजागृती झाली पाहिजे.

१२) सध्या पशुखाद्य व चारा यांच्या किमती भरपूर वाढल्या आहेत. त्यानुसार दुधाला दर समाधानकारक नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नाही असे शेतकरी म्हणत असतो. याबाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे वाटते.

१३) जनावरांचा विमा ही व्यापक प्रमाणावर सुरू होणे गरजेचे आहे, जेणेकरून जनावरांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

१४) चारा उत्पादन कसे वाढवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चारा लागवडीखालील क्षेत्र अत्यल्प असल्याने सकस आहार मिळत नाही. चारापिकांखालील क्षेत्र वाढवल्यास खाद्यावर होणारा खर्च कमी करता येईल.

१५) प्रत्येक गावाजवळ चराऊ रान/गायरान आहेत. त्या ठिकाणी सामूहिक वैरण लागवडीसारखे प्रयत्न केल्यास निसर्गनिर्मित चारा जनावरांना मुबलक प्रमाणात मिळू शकेल.

१६) विशेषतः मोकाट फिरणारी जनावरे ही अनेक समस्या निर्माण करत आहेत. रस्त्यावर अपघात, वाहतूक व्यवस्था कोलमडणे, वयोवृद्ध लोकांना धक्का मारणे यासह लम्पी स्कीनसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होतो. अशावेळी मोकाट जनावरांची समस्या कशी सोडता येईल, ते पाहावे.

पशुपालकांना पशुपालन हा शाश्‍वत, हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. त्यासाठी एकूण विज्ञान, धोरण आणि परंपरा याची सांगड घालून वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित विषयातील तज्ज्ञांनी पुढाकार घेतल्यास एकूण मानवजातीच्या कल्याणाबरोबरच या व्यवसायाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पशुपालकांना पाहता येईल. काही जैविक संशोधने ही त्या त्या काळानुरूप उपलब्ध वातावरणाशी निगडीत त्याचे परिणाम दर्शवत असतात, ती सर्व त्रिकालाबाधित सत्य ठरतीलच असे नाही. त्यासाठी वारंवार त्यावर संशोधन होऊन त्याचे परिणाम हे समाजासमोर यायला हवेत. देशातील, राज्यातील अनेक संस्था संबंधित अनेक विषयांवर संशोधन करीत आहेत. त्यांचे निष्कर्ष, परिणाम हे सप्रमाण सिद्ध होऊन समाजासमोर यायला हवेत. निव्वळ टीकात्मक सूर असेल, आरोप प्रत्यारोप होत राहिल्यास कोणत्याही घटकाचे भले होणार नाही हे निश्‍चित!

(लेखक स्वेच्छा सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी आहेत.)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!