गोकुळमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धेला बहर, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूरःता.०७.कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पादक संघ लि.,(गोकुळ)कोल्हापूर यांच्या वतीने गोकुळ झिम्मा-फुगडी स्पर्धा संघाच्या ताराबाई पार्क येथे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची जपणूक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
वेगवेगळ्या लोककला प्रकारांच्या सादरीकरणातून नृत्याचा लयबद्ध अविष्कार, पारंपारिक लोकगीतावर महिलांनी धरलेला फेर आणि प्रत्येक कलाप्रकाराला मिळणारा भरभरून प्रतिसाद अशा उत्साही आणि जल्लोष वातावरणात गोकुळतर्फे भरवलेली झिम्मा फुगडी स्पर्धा रंगली. नाकात नथ, सुंदरशी साडी असा मराठमोळा वेश परिधान केलेल्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक महिलांनी एकसे बढकर एक कलाप्रकार सादर करत गोकुळच्या झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये बहार आणली. संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाचा आवारात आज सकाळपासूनच अक्षरशा फुलून गेला होता. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील दूध उत्पादक महिलांनी झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आजचा दिवस माझा हेच सिद्ध करून दाखविले. ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ आणि लोककलांचे संवर्धन हा उद्देश ठेवून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा झाली नव्हती यंदा कोरोनाचे संकट दूर होताच गोकुळने झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत दोन हजारहून अधिक महिला सहभागी होऊन गोकुळशी जडलेल नात या पारंपारिक लोककलेच्या माध्येमातून आणखी घट्ट केल.
गोकुळचे नेते व माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उदघाटन समारंभ झाला. याप्रसंगी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी, झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. गोकुळ दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सभासद हिताच्या योजना राबविताना महिला शेतकऱ्यांच्यासाठी झिम्मा फुगडीसारख्या स्पर्धेचे आयोजन करत वेगळे नातेबंध जपले आहेत. महिला सभासदांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटावा.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, "गोकुळमार्फत नेहमीच महिला दूध उत्पादकांच्या साठी पारंपारिक लोककला प्रकारांची स्पर्धा भरवण्यात येते. तब्बल सव्वा लाख रुपयांहून अधिक रक्कम बक्षीस स्वरूपात विजेत्यांना दिली जाणार आहे. पारंपारिक लोककला प्रकाराला प्रोत्साहन आणि महिलाच्या कलागुणांना व्यासपीठ हा मुख्य उद्देश आहे. बारा महिने उन्हात राबणाऱ्या महिला सभासदांच्या जीवनात या स्पर्धेच्या निमित्ताने आनंदाची उधळण होईल. महिलांनी स्पर्धेचा पुरेपूर आनंद घ्यावा."
स्पर्धेचा उद्घाटन झाल्यानंतर लोक कलाप्रकारांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. महिलांनी झिम्मा फुगडी, घागर घुमविणे,चुईफुई,ओव्यांचे सादरीकरण करत स्पर्धेत धमाल केली. स्पर्धेतील इतर महिलांच्या गटापेक्षा आपल्या गटाचे सादरीकरण उत्कृष्ट व्हावे यासाठी सहभागी स्पर्धकांची धडपड सुरू होती. वेगवेगळ्या लोककला प्रकारांच्या सादरीकरणातून नृत्याचा लयबद्ध अविष्कार, पारंपारिक लोकगीतावर महिलांनी धरलेला फेर यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. त्यामुळे स्पर्धेतील रंगत शेवटपर्यंत कायम राहिली. गोकुळचा परिसर महिलाच्या उत्साही सादरीकरणाने व विविध कलाविष्कारांनी फुलला.तसेच या स्पर्धेमध्ये तब्बल १८० गटांनी सहभाग घेतल्यामोळे रात्री उशिरापर्यंत स्पर्धा चालू राहतील. स्पर्धा रंगतदार चालू आहेत.
याप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ,गोकूळचे चेअरमन विश्वास पाटील,माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, तज्ञ संचालक विजयसिंह मोरे,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.