अवैध मद्य साठा व विक्री बंदीसाठी
व्यापक तपासणी मोहीम राबवा
कोल्हापूर :
अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारा मद्य साठा व विक्री बंद करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात तपासणी मोहीम राबवा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत श्री. देसाई यांनी हे निर्देश दिले. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी, अधीक्षक रवींद्र आवळे यांच्यासह विभागाचे निरीक्षक उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारा मद्य साठा व विक्रीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होण्याबरोबरच शासनास मिळणारा महसूल मिळत नाही. यासाठी अवैध मद्यविक्री बंद करण्यासाठी व्यापक स्वरूपात मोहीम राबवा. शेजारील कर्नाटक व गोवा राज्यातून होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी या मार्गावर कडक तपासणी सुरु करा. यासाठी तात्पुरते चेक नाके उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविल्यास त्यास मान्यता देण्यात येईल, असेही श्री. देसाई म्हणाले.
श्री. देसाई म्हणाले, राज्याला महसूल मिळवून देणारा आपला महत्वाचा विभाग असून विभाग सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. विभागास यावर्षी महसुलाचे जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी अवैध मद्य साठा जप्त करुन संबंधितावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.