लम्पी चर्मरोग : औषधोपचार व लसीकरणाचा खर्च राज्य शासनामार्फत
पशुपालकांनी भीती बाळगू नये
महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधकृष्ण विखे-पाटील
कोल्हापूर :
लम्पी चर्मरोगामुळे पशुधन बाधित होवू नये, दगावू नये, यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. लम्पी आजारावरील औषधोपचाराचा आणि लसीकरणाचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येत असून पशुपालकांनी भीती बाळगू नये असे, आवाहन महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे-पाटील यांनी आज हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव, अतिग्रे या गावांना भेटी देवून लंपी चर्मरोग आजारामुळे बाधित पशुधनाची पाहणी केली व पशुपालकांना दिलासा दिला. त्यानंतर हातकणंगले तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, राजू आवळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी विजय पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. विखे-पाटील म्हणाले, राज्यात ३० जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जाणवत असून लम्पी चर्मरोगामुळे शेतकऱ्यांचे पशुधन दगावू नये ही राज्य शासनाची भूमिका आहे. यासाठी राज्य शासनाने तत्परतेने अनेक उपाय योजना राबविल्या आहेत. यामध्ये जनावरांची अंतरराज्य,अंतरजिल्हा वाहतूक बंदी आणि जनावरांचा बाजार बंद यासारखे उपाय राबविण्यास प्राधान्य दिले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखलेल्या उपाय योजनांमध्ये कांही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे 93 टक्के लसीकरण झाले असून प्रशासन व पशुवैद्यकीय विभागाने केलेले हे काम कौतुकास्पद आहे. यामध्ये गोकुळ, वारणा सारख्या दुध संघाचेही सहकार्य लाभले आहे. लसीकरणाच्या कामास गती देवून पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
पशुसंर्वधन विभागाकडील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जात असल्याचे सांगून या आजारावर उपचार करण्यासाठी राज्यात एक हजार खाजगी पशुवैद्यकीयांची नियुक्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील इंटरशीप करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा यासाठी घेण्यात आल्या असून त्यांना फिल्डवर पाठविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
पशुसंर्धन मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी लम्पी चर्मरोगावरील उपचारासाठी आपल्या पशुधनावर तातडीने उपचार करण्यासाठी स्वत: खासगी दवाखान्यातून औषधे खरेदी केली आहेत, अशा पशुपालकांनी औषध खरेदी केल्याबाबतची माहिती पुराव्यासह सादर केल्यास त्यासाठी आलेला खर्च त्यांना परत देण्यात येईल. पशुपालकांनी लम्पी चर्मरोगाची लक्षणे दिसताच उपचार केले तर रोग लवकर बरे होण्यास मदत होते. सर्व पशुपालकांनी लंपी चर्मरोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लम्पी अजाराबाबतची लक्षणे व माहिती पशुपालकांपर्यंत पोहचावी यासाठी प्रशासनाने प्रयत्ने करावेत. यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी आणि पशुवैद्यकीयांची जिल्हाधिकारी यांनी व्हीसी घेऊन त्यांना सूचना कराव्यात. तालुकास्तरावर हेल्पलाईन नंबर घोषित करावेत. तसेच जिल्ह्यात पशुधन वाहतुकीबाबत कडक निर्बंध घालावेत. प्रशासन व पोलीस विभागाने या बाबत दक्ष रहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
लम्पी चर्मरोगावर खासगी पशुवैद्यकीय व्यावसाईकाने उपचार करु नयेत, अशी कोणतही बंदी घालण्यात आलेली नसल्याचे सांगून श्री. विखे-पाटील म्हणाले, असे आदेश कोणी दिले असल्यास त्याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. लसीकरण व औषधोपचारांसाठी खाजगी डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. परिस्थितीचे गांर्भीय ओळखून सर्वच यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होत असल्याने यासाठी पर जिल्ह्यातून येणाऱ्या पशुधनाचे लसीकरण झाले आहे किंवा नाही याची खातरजमा करुनच अशा जनावरांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. गळीत हंगामासाठी पर जिल्ह्यातील येणाऱ्या पशुपालकांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वागत करुन जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाबाबत सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली.