यंदा साखर कारखान्यांचे गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून
मुंबई :
यंदा साखरेचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी साखर कारखाना सुरू केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
उसाचे क्षेत्र यंदा वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
यंदाच्या हंगामासाठी सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर उसाची लागवड आहे. राज्यात ऊसलागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टरने वाढले आहे.यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
राज्याने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले,यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस चालेल, अशी अपेक्षा आहे. यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी प्रारंभिक १०.२५ टक्के उताऱ्यासाठी प्रति मेट्रिक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.