शेतकरी संघटनेचा आवाज हरपला ;
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी.पाटील यांचे निधन
कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्राततील शेतकरी संघटनेचे नेते , कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गणपती उर्फ पी.जी. पाटील (वय ७७) रा.वाकरे ता. करवीर यांचे निधन झाले. शेतकरी चळवळीचा आवाज हरपल्याची भावना शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहेत.
पी.जी.पाटील यांनी कॉलेजच्या जीवनापासून संघटनात्मक कामाला सुरुवात केली, सुरुवातीला जनता दलातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, ऊस दर ,दूध दर आंदोलनाला सुरुवात केली, यशवंत बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली, यानंतर रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. ऊस दराचे आंदोलन त्यांनी उत्तम पद्धतीने हाताळले, उसाला सातशे रुपये दर त्यावेळी मिळत होता, तेव्हापासून तीन हजार रुपये दर मिळेपर्यंत त्यांनी आंदोलनाची धार कायम ठेवली होती.
गावात शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळावा यासाठी शेतकरी दूध संस्थेची स्थापना केली, या शेतकरी दूध संस्थेत फक्त शेतकऱ्यांचे हित जोपासले जाते, स्थापनेपासून गेली २५ वर्षे ठरावाला मूठमाती देत ,गोकुळ चे सभासदत्व नाकारणारी जिल्ह्यातील ही एकमेव दूध संस्था आहे.
उसाला दर मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने केली ,वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला आहे. खासदार राजू शेट्टी, रघुनाथ दादा पाटील, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या संघटने बरोबर काम केले आहे.
काही दिवस पी. जी. पाटील यांच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते ,अल्पशा आजाराने आज उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले . त्यांच्या निधनाने वाकरे गावासह शेतकऱ्यांच्यावर शोककळा पसरली आहे.
—————-
श्रीकांत घाडगे, जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती संघटना,
सन 1978 पासून पी.जी .पाटील यांच्याबरोबर आम्ही शेतकरी संघटनेत एकत्र काम केले, त्यावेळी उसाला ५६० रुपये दर होता ,तो साडेचारशे करण्याचा घाट होता ,पश्चिम महाराष्ट्रात मोठे आंदोलन झाले ,आणि साडेसातशे रुपये उसाला दर मिळाला.
पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, आंदोलनाची धार गेली ४० वर्षे कायम ठेवली, त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे आणि शेतकरी संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे.