राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार

पुणे :

‘केंद्र सरकारने लम्पी त्वचा रोगाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केल्यामुळे आता राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे १ कोटी ३९ लाख इतकी गोवंशाची संख्या असून यापैकी आठ लाख गोवंशाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सरकारकडे २२ लाख ५४ हजार लशींचा साठा आहे. २५ लाख लशी उद्या (शनिवारी) मिळणार आहेत,’ अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले, ‘‘राज्यातील गोवंशात संसर्ग होत असलेला लम्पी त्वचा रोग सध्या नियंत्रणात आहे. राज्यातील एकूण ११४ तालुक्यांत बाधित पशुधनाची संख्या ४१४३ आहे. उपचाराने १८६३ जनावरे बरी झाली आहेत. या पूर्वी बाधित जनावरांच्या पाच किमोमीटरच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्याचे केंद्राचे आदेश होते. आता केंद्राने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. पाच किलोमीटरची अट काढून टाकली असून, आता राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार आहे. पुढील महिनाभरात युद्धपातळीवर मोहीम राबवून सुमारे १ कोटी ३९ लाख गोवंशांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दररोज दोन लाख जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.’’

जिल्हाधिकाऱ्यांना एक कोटीचा निधी…..

लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक कोटींची निधी दिला आहे. पशुसंवर्धन विभागात तातडीने सुमारे एक हजार जागा भरण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या धर्तीवर राज्य सरकार मृत जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करणार आहे. मृत दुधाळ जनावराला ३० हजार, बैलांना २५ हजार आणि वासरांना १५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. या शिवाय जिल्हा परिषदांनी आपल्या निधीतून आर्थिक मदत करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. पशुसवंर्धन विभाग पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर सक्रिय झाला आहे, असेही विखे म्हणाले.

भटक्या गोवंशाची काळजी महानगर पालिकांनी घ्यावी….

शहरी भागातील भटक्या जनावरांचा प्रश्न महानगर पालिकांनी हाताळावा. भटक्या जनावरांना लसीकरण करायचे असल्यास पशुसंवर्धन विभाग पुढाकार घेईल. तांत्रिक मदत करेल. भटक्या गोवंशाची सोय पांजरपोळ आणि गोशाळांमध्ये करायला पाहिजे. उत्तरेकडील राज्यांइतका मोकाट गोवंश आपल्याकडे नाही. त्यामुळे उत्तर भारतात ज्या वेगाने लम्पी रोगाचा संसर्ग झाला, तसा संसर्ग आपल्याकडे झाला नाही, असेही विखे म्हणाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!