कोल्हापूर :
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहीमेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावर्षी स्वच्छता ही सेवा अभियानात गावांची दृश्यमान स्वच्छता ही थीम घेऊन हे अभियान गावागावात राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवुन “स्वच्छता ही सेवा” मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी व आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार दि. 15 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोंबर कालावधीत “स्वच्छता ही सेवा” अभियानअंतर्गत गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या कालावधीत पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत-
गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता राखणे, गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे,
कचरा निर्मितीच्या ठिकाणी (सुका व ओला) वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि
विलगीकरण केंद्र निर्माण करणे, प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करुन नियोजन करणे,
पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा आयोजित करुन यापूर्वी प्लॅस्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांवर ‘सरपंच संवाद’ आयोजित करणे, कचरा न करणे याविषयावर घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे तसेच स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी या विषयावर वक्तृत्व,निबंध,रांगोळी, सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी मंडळांना आवाहन करणे. या उपक्रमांसोबतच स्थानिक परिस्थितीनुसारपाणी व स्वच्छतेविषयक अन्य कल्पक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियानात गावातील सरपंच, सदस्य, गावातील समाजसेवी संस्था व ग्रामस्थ यांनी सहभागी होवुन स्वच्छता ही सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केलेआहे.